दुर्गापूजा मंडपातील चेंगराचेंगरीत कोलकातामध्ये १९ भाविकांचा मृत्यू; दुर्गापूजा समितीच्या सचिवासह ७ जणांना अटक…

कोलकाताः येथील दुर्गा पूजेच्या मंडपात शनिवारी (ता. १७) रात्री झालेल्या चेंगराचेंगरीत १९ जणांचा मृत्यू झाला असून, अनेक जण जखमी झाले आहेत. किमान २५ जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी दुर्गापूजा समितीच्या सचिवासह सात जणांना अटक केली आहे. चोरबागान दुर्गा पूजा समितीचे सचिव राज कुमार सेवड आणि उपाध्यक्ष शांतनु दुबे यांच्यासह बांबूची रचना उभारण्यात गुंतलेले बिप्लब मुखर्जी, गर्दी नियंत्रणाची जबाबदारी असलेले कौशिक साहा आणि पिंटू डे, तसेच खासगी सुरक्षा प्रभारी सुमन चक्रवर्ती आणि राजेश पाल, यांचा अटक केलेल्यांमध्ये समावेश आहे.

पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी म्हणाले, की चोरबागान येथील सामुदायिक दुर्गा पूजेच्या आयोजकांनी केलेल्या घोषणेमुळे भाविकांची मोठी गर्दी झाली आणि त्यातूनच ही दुःखद घटना घडली. दोन पीडितांच्या कुटुंबीयांच्या दाव्यानुसार मंडप परिसरात खासगी सुरक्षा रक्षकांनी शिट्टी वाजवल्यामुळे, मंडपात जाण्यासाठी थांबलेल्या लोकांमध्ये गर्दी झाली.

घटनास्थळावरील अधिकाऱ्यांच्या प्राथमिक अहवालानुसार, पूजा आयोजकांनी ध्वनिवर्धकावरून केलेल्या घोषणेमुळे ही घटना घडली, असे अधिकारी यांनी कोलकाता मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात जखमींची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.

पोलिसांनी खुनाच्या श्रेणीत न येणाऱ्या सदोष मनुष्यवधाचा स्वतःहून गुन्हा दाखल केला आहे. १० दिवसांच्या हिंदू उत्सवाच्या सातव्या दिवशी, मोठ्या संख्येने भाविकांना आकर्षित करणाऱ्या चोरबागान दुर्गा पूजा मंडपात, मुसळधार पावसात सायंकाळी ७:४० च्या सुमारास ही चेंगराचेंगरी झाली.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांच्याशी फोनवर संवाद साधला आणि जखमींना भेटण्यासाठी रुग्णालयात जाणार असल्याचे सांगितले. त्यांनी अपघातात प्राण गमावलेल्या भाविकांप्रति शोक व्यक्त केला आणि जखमींच्या शीघ्र आरोग्यासाठी प्रार्थना केली. या भीषण अपघातानंतर अमित शाह यांनी पश्चिम बंगालमधील आपले सर्व नियोजित कार्यक्रम स्थगित केले आहेत.

राष्ट्रपती दौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह इतर नेत्यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे. पंतप्रधान मोदींनी जखमी आणि मृतांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाईची घोषणाही केली आहे.

पंतप्रधान कार्यालयाने सांगितले की, मृतांच्या कुटुंबीयांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी २ लाख रुपये आणि जखमींना ५० हजार रुपयांची सानुग्रह मदत जाहीर केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, की कोलकातामधील चेंगराचेंगरी अत्यंत दुःखद आहे. ‘ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत, त्या सर्वांप्रति माझ्या संवेदना आहेत. जखमी लवकर बरे व्हावेत अशी माझी इच्छा आहे. स्थानिक प्रशासन बाधित लोकांना सर्वतोपरी मदत करत आहे.’

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!