
ओमानजवळ टँकरवर झालेल्या ड्रोन हल्ल्यात दोन भारतीय खलाशी बेपत्ता; ९ जणांची सुटका…
नवी दिल्लीः ओमानमधील सोहार बंदरामध्ये निकाराग्वा देशाचा ध्वज असलेल्या ‘एमटी पेट्रो डॉल्फिन’, या टँकरवर झालेल्या ड्रोन हल्ल्यानंतर, दोन भारतीय कर्मचारी बेपत्ता झाले आहेत. टँकरवरील अन्य ९ कर्मचाऱ्यांची सुटका करण्यात आली आहे, असे केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी आज येथे सांगितले.
‘एक्स’ या सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये, सोनोवाल यांनी म्हटले आहे, की ११ ऑक्टोबर रोजी हा हल्ला झाला होता. बेपत्ता कर्मचाऱ्यांचा शोध घेण्यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांतर्फे शोध आणि बचाव कार्य चालू आहे.
स्थानिक तटरक्षक दलातर्फे शोध आणि बचाव कार्य सक्रियपणे सुरू आहे. चालू असलेल्या बचाव कार्याला पूर्ण पाठिंबा देण्यासाठी आणि आपल्या बेपत्ता कर्मचाऱ्यांचा सुरक्षितपणे शोध घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील याची खात्री करण्यासाठी, भारत सरकारतर्फे सर्व संबंधित अधिकाऱ्यांशी समन्वय साधला जात आहे, असे त्यांनी सांगितले.
मस्कतमधील भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यांनी एमटी पेट्रो डॉल्फिनशी संबंधित परिस्थितीवर बारकाईने लक्ष असून, संबंधित अधिकाऱ्यांच्या सतत संपर्कात असल्याचे सांगितले. ओमानच्याच किनाऱ्याजवळ काही दिवसांपूर्वी भारतीय कर्मचारी असलेल्या दुसऱ्या एका जहाजावरही हल्ला झाला होता. होर्मुझच्या सामुद्रधुनीत पनामाचा ध्वज असलेल्या एमटी ऑन पीस या व्यापारी जहाजावर ६ ऑक्टोबर रोजी हल्ला झाला होता. या जहाजावरही भारतीय कर्मचारी होते. भारताने या हल्ल्याचा निषेध केला होता. परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार, जहाजावर १७ भारतीय कर्मचाऱ्यांसह एकूण १९ कर्मचारी होते. या हल्ल्यात ११ भारतीयांसह १२ कर्मचारी जखमी झाले होते.
परराष्ट्र मंत्रालयाने या प्रदेशात जहाजांवर होणारे हल्ले हे भारतासाठी अत्यंत चिंतेचे कारण असल्याचे म्हटले असून, प्रादेशिक शांतता व स्थैर्याच्या हितासाठी अशा घटना त्वरित थांबवण्याचे आवाहन केले आहे.
या प्रदेशात व्यापारी जहाजवाहतूक, खलाशी आणि नागरी पायाभूत सुविधांना लक्ष्य करणे थांबले पाहिजे आणि आंतरराष्ट्रीय जलमार्गांमधून होणारी जलवाहतूक आणि व्यापार लवकरात लवकर पूर्ववत केला पाहिजे, असे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.

