
बलुच लिबरेशन आर्मीच्या हल्ल्यात ग्वादरमध्ये पाकिस्तानी तटरक्षक दलाचे १३ जवान ठार…
इस्लामाबाद: बलुचिस्तानच्या ग्वादर जिल्ह्यातील जिवानी येथे बलुच लिबरेशन आर्मीच्या (बीएलए) एका तुकडीने पाकिस्तानच्या तटरक्षक दलाच्या दोन बोटींवर जोरदार हल्ला केला. त्यात तटरक्षक दलाचे १३ सैनिक ठार झाल्याचे बीएलएच्या सूत्रांनी सांगितले. ही कारवाई त्यांची सागरी शाखा असलेल्या हम्माल मेरिटाइम डिफेन्स फोर्सने केल्याचा दावा या गटाने केला आहे.
बीएलएने या कारवाईची जबाबदारी स्वीकारली आहे. एका निवेदनात त्यांनी म्हटले आहे,की या हल्ल्यात पाकिस्तानी तटरक्षक दलाच्या दोन बोटींना लक्ष्य करण्यात आले आणि त्यात १३ सैनिक ठार झाले आहेत.
या अधिकृत निवेदनात, बलुच लिबरेशन आर्मीने म्हटले आहे की हा हल्ला त्यांच्या विशेष नौदल शाखा, हम्माल मेरिटाइम डिफेन्स फोर्सने केला होता. बीएलएचे प्रवक्ते जियांद बलोच यांच्या म्हणण्यानुसार, संघटनेने १३ एप्रिल रोजी आपला सागरी विभाग स्थापन केला होतो. त्यांनी स्थापनेच्या एक दिवस आधी, मिल तियाब परिसरात आपली पहिली सागरी कारवाई केली होती. त्यात पाकिस्तानी नौदलाच्या गस्ती बोटीला लक्ष्य करून तीन सैनिकांना ठार केले होते. या गटानुसार, हा विभाग किनारपट्टीच्या भागांचे संरक्षण करण्यासाठी आणि पाकिस्तानी सुरक्षा दलांच्या हालचालींना रोखण्यासाठी काम करते.
दक्षिण बलुचिस्तानमधील ग्वादर बंदर वादाचा मुद्दा बनले आहे. चीन या बंदराला आपल्या ‘बीआरआय’ प्रकल्पाचा भाग मानतो. या बंदरामुळे चीनला अरबी समुद्रापर्यंत थेट प्रवेश मिळतो. परंतु, या बंदरावर बलुचिस्तानचा अधिकार असून, पाकिस्तानने बेकायदेशीरपणे चीनला हे बंदर दिले आहे, असा त्यांचा दावा आहे.
बलुचिस्तानची जमीन पाकिस्तान आणि चीन हिसकावून घेत आहेत. परकीय शक्तींकडून त्यांच्या संसाधनांचा वापर केला जात आहे आणि त्या बदल्यात त्यांना रोजगारही मिळत नाही किंवा परिसराचा विकासही होत नाही, अशी बीएलएची तक्रार आहे. आपण पाकिस्तानचा भाग नसून, स्वतंत्र असल्याचे बलुचिस्तानने यापूर्वीच जाहीर केले आहे.
एके काळी शांत किनारपट्टीचे शहर असलेल्या ग्वादरमध्ये आता मोठ्या प्रमाणात लष्करी तळ स्थापन केल्यामुळे स्थानिकांमधील असंतोष वाढतो आहे.

