
लखनऊतील अल्पवयीन मुलाने केली आपल्याच आईची हत्या आणि पोलिसांना फोन करून दिली माहिती…
लखनऊः येथील एका १७ वर्षीय मुलाने आपल्या आईची (वय ४२) हत्या केली. पोलिसांच्या माहितीनुसार, घटनेनंतर त्याने स्वतःच पोलिसांना फोन करून या प्रकाराची माहिती दिली. ‘मी माझ्या आईची हत्या केली आहे. कृपया लवकर या,’ असे त्याने सांगितल्याचे पोलिसांनी सांगितले. या मुलाची ओळख समीर म्हणून पटली असून, मृत महिलेचे नाव गीता भगचंदानी असल्याचे समजते.
ही घटना नाका हिंदोला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राजेंद्र नगर येथील व्हिजन अपार्टमेंटमध्ये घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समीरने आपल्या आईच्या डोक्यात पान्याने अनेक वेळा प्रहार केले आणि त्यानंतर स्वतःच पोलिसांना फोन करून माहिती दिली. पोलीस तातडीने घटनास्थळी पोचले आणि मृतदेह ताब्यात घेऊन, समीरला ताब्यात घेतले. पुढील तपास चालू असल्याचे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.

