बलात्कार प्रकरणातील दोषी प्रज्वल रेवण्णा तुरुंगात ‘पोर्न’ पहात होता का? माजी खासदाराच्या फोनमध्ये सापडले डझनभर व्हिडिओ…

बंगळुरू: बलात्कार प्रकरणी तुरुंगात असलेला, जनता दल (सेक्युलर) पक्षाचा माजी खासदार प्रज्वल रेवण्णा याच्याकडून जप्त केलेल्या मोबाईल फोन आणि इतर उपकरणांच्या फॉरेन्सिक तपासणीत अनेक अश्लील व्हिडिओ असल्याचे उघड झाले आहे. गेल्या महिन्यात गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी घातलेल्या छाप्यात, रेवण्णा तुरुंगातील कोठडीत मोबाईल फोन वापरताना पकडला गेला होता.

रेवण्णा हा माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचा नातू आणि केंद्रीय मंत्री एच. डी. कुमारस्वामी यांचा भाचा आहे. बलात्काराच्या एका प्रकरणात दोषी ठरल्यानंतर तो बंगळुरूच्या परप्पना अग्रहारा मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे.

बंगळुरू पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी ११ ऑगस्ट रोजी घातलेल्या छाप्यात रेवण्णा मोबाईल फोन वापरताना आढळला. प्रज्वलला ठेवलेल्या उच्च सुरक्षा कोठडीतून एक चार्जर, एक पेन ड्राइव्ह आणि एक वही जप्त केली आहे.

जप्त केलेला फोन आणि पेन ड्राईव्ह फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आले असून, फोनमध्ये डझनभर अश्लील व्हिडिओ आणि पेन ड्राईव्हमध्ये वेब सिरीज होत्या, असे फॉरेन्सिक खात्याने दिलेल्या अहवालामध्ये नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणामुळे बंगळुरूच्या मध्यवर्ती कारागृहातील व्हीआयपी कैद्यांना मिळणाऱ्या विशेष सुविधांकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले गेले आहे.

एका ४८ वर्षीय महिलेवर बलात्कार करून, त्या लैंगिक अत्याचाराचे व्हिडिओ प्रसारित केल्याबद्दल रेवन्नाला गेल्या वर्षी दोषी ठरवण्यात आले होते. हासन जिल्ह्यातील होळेनरसीपुरा येथील रेवण्णा कुटुंबाच्या फार्महाऊसवर घरकाम करणाऱ्या या महिलेच्या आरोपानुसार प्रज्वल रेवण्णाने २०२१ पासून तिच्यावर अनेक वेळा बलात्कार केला होता.

त्याने त्या कृत्याचे चित्रीकरण करून, कोणाला सांगितल्यास ते प्रसिद्ध करण्याची धमकी दिली होती. रेवण्णाच्या कोठडीतून फोन मिळविल्यानंतर, प्रशासनाने एका तुरुंग अधिकाऱ्याला निलंबित करून चौकशीचे आदेश दिले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!