नेरुळ रेल्वे स्थानकात मद्यपी, गर्दुल्ले, बेघरांविरोधात कारवाई; कायमस्वरूपी उपाययोजनांची मागणी…

नवी मुंबई: नेरुळ रेल्वे स्थानक परिसरात मद्यपींकडून होणारी हुल्लडबाजी, अंमली पदार्थांचे सेवन व विक्री, गुटख्याची विक्री तसेच बेघर आणि गर्दुल्ल्यांमुळे प्रवाशांना होणारा त्रास रोखण्यासाठी, नवी मुंबई पोलिसांनी महापालिका आणि ‘सिडको’च्या सहकार्याने मध्यरात्री धडक कारवाई केली. या पार्श्वभूमीवर, नवी मुंबईतील रेल्वे स्थानकांच्या परिसरात कायमस्वरूपी सुरक्षा व देखरेख व्यवस्था उभारण्याची गरज असल्याचे, महापौर सुजाता पाटील यांनी येथे सांगितले.

नेरूळ रेल्वे स्थानक परिसरात १ सप्टेंबरला रात्री ११.३० ते २ सप्टेंबर रोजी पहाटे १.३० वाजेपर्यंत संयुक्त कारवाई करण्यात आली. नवी मुंबई पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त अमित काळे, ‘सीबीडी’ विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त संदेश नाईक आणि नेरूळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय कांबळे यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबवण्यात आली. याबाबत आयोजित पत्रकार परिषदेत सुजाता पाटील यांनी वाढत्या गैरप्रकारांबाबत चिंता व्यक्त केली. नवी मुंबईत रेल्वे प्रशासन, ‘सिडको’, पालिका आणि पोलीस प्रशासन अशी चार प्रमुख प्राधिकरणामध्ये प्रभावी समन्वय आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

वाशी, नेरूळसह नवी मुंबईतील अनेक रेल्वे स्थानके पूर्वी स्वच्छ आणि सुंदर म्हणून ओळखली जात होती. मात्र आज काही स्थानकांच्या परिसरात मद्यपी, गर्दुल्ले, बेघर आणि अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे, असे त्यांनी नमूद केले.

रेल्वे स्थानकांवर अधूनमधून मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यापेक्षा कायमस्वरूपी प्रतिबंधात्मक व्यवस्था उभारणे अधिक प्रभावी ठरेल, असे मत महापौरांनी व्यक्त केले. प्रत्येक प्रमुख रेल्वे स्थानकाबाहेर छोटी पोलीस चौकी उभारून तेथे पोलिसांसह संबंधित चार प्राधिकरणांपैकी प्रत्येकी एका कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्याची सूचना त्यांनी केली.

महिन्यातून किंवा पंधरा दिवसांनी मोहीम राबवून कर्मचारी तैनात करण्यापेक्षा रोजच्या रोज देखरेख ठेवली, तर गैरप्रकारांना आळा बसेल. स्टेशन परिसरात कायमस्वरूपी चौकी आणि कर्मचारी असल्यास तेथे गैरप्रकार करणाऱ्यांवर आपोआप धाक निर्माण होईल, असे त्यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!