मॅगी, लेज आणि कुरकुऱ्यांच्या पाकिटांवरील मुदत समाप्तीची तारीख बदलणाऱ्या टोळीला एफडीएचा बडगा…

मुंबई: महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) उत्पादन आणि मुदत समाप्तीची तारीख बदलून नव्याने खाद्यपदार्थांची पुनर्विक्री करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश केला आहे. एफडीए आणि नवी मुंबई पोलिस गुन्हे शाखेने केलेल्या या संयुक्त कारवाईत जप्त केलेल्या मालामध्ये, देशातील काही सर्वांत मोठ्या लोकप्रिय खाद्य आणि पेय उत्पादकांचा समावेश आहे.

जप्त केलेल्या साठ्यात लेज, कुरकुरे, मॅगी, नॉर, रसोई, हेलमन्स, थम्स अप आणि लिम्का या उत्पादनांचा समावेश होता. या पाकिटांमध्ये क्लासिक सॉल्टेड, मॅजिक मसाला, स्पॅनिश टँगी टोमॅटो, सिझलिंग हॉट आणि लेमन चिली या प्रकारांचा समावेश होता.

पोलिसांच्या केंद्रीय गुन्हे शाखेकडून माहिती मिळाल्यानंतर, २४ ते २९ ऑगस्ट दरम्यान तुर्भे टीटीसी औद्योगिक क्षेत्रातील साधना एंटरप्रायझेसच्या आवारात ही कारवाई करण्यात आली.

एफडीएच्या म्हणण्यानुसार, खाद्यपदार्थांच्या पाकिटांवरील छापलेल्या तारखा काढून टाकल्या जात होत्या किंवा त्यांच्या जागी दुसऱ्या तारखा टाकल्या जात होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, एफडीएच्या अधिकाऱ्यांना असे आढळून आले, की उत्पादनाची मूळ माहिती पुसण्यासाठी किंवा लपवण्यासाठी इंकजेट प्रिंटर, थिनर्स आणि खास तयार केलेल्या स्टिकर्सचा वापर केला जात होता.

मुंबई, दिल्ली आणि नोएडा येथील आयात-निर्यात कंपन्यांचाही यात सहभाग आहे. एफडीएने दिलेल्या माहितीनुसार, या कारवाईदरम्यान १० निर्यातदार कंपन्यांचे ८,४४२ खोकी जप्त करण्यात आली असून, त्यांचे एकूण मूल्य ७,५२१,२६९ रुपये आहे. याव्यतिरिक्त, त्याच ठिकाणाहून अंदाजे ३०,६०० रुपये किंमतीचा लेबल नसलेला माल आणि मुदत संपलेली खाद्य उत्पादने जप्त करण्यात आली आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!