
पोलिस कर्मचारी आत्महत्येप्रकरणी धक्कादायक माहिती समोर…
मुंबई: विष्णूनगर (डोंबिवली) पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस कर्मचारी श्रीराम माणिक मिसाळ (वय ३७) यांच्या आत्महत्येप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. मृताच्या भावाच्या तक्रारीवरून श्रीराम यांच्या पत्नीविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
श्रीराम मिसाळ यांनी २८ एप्रिल रोजी मध्यरात्रीच्या सुमारास त्यांच्या राहत्या घराच्या टेरेसवर नायलॉनच्या दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. सुरुवातीला आत्महत्येमागील नेमके कारण स्पष्ट झाले नव्हते. मात्र, कुटुंबीयांनी व्यक्त केलेल्या संशयानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला. श्रीराम मिसाळ यांचे भाऊ लक्ष्मण माणिक मिसाळ (रा. तांबेवाडी, ता. शिरूर कासार, जि. बीड) यांनी दिलेल्या फिर्यादीच्या आधारे श्रीराम यांच्या पत्नी शिवगंगा महादेव शिरसाठ उर्फ शिवगंगा श्रीराम मिसाळ यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम १०८ अंतर्गत आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
View this post on Instagram
श्रीराम आणि शिवगंगा यांचा विवाह २०११ मध्ये झाला होता. विवाहानंतर पत्नीने सातत्याने मानसिक त्रास दिला, असा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. यामध्ये वारंवार अपमानास्पद वागणूक देणे, कौटुंबिक वाद निर्माण करणे, धमक्या देणे आणि मानसिक छळ करणे यांसारख्या बाबींचा उल्लेख करण्यात आला आहे. या प्रकरणातील सर्वात गंभीर बाब म्हणजे एफआयआरमध्ये एका सहकारी पोलिस अधिकाऱ्यासोबत कथित अनैतिक संबंध असल्याचा दावा करण्यात आला आहे. या कथित संबंधांमुळे पती-पत्नीमधील वाद अधिक तीव्र झाल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. या कारणामुळे श्रीराम मिसाळ मानसिकदृष्ट्या खचले होते, असेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. मृताच्या कुटुंबीयांना खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकविण्याच्या धमक्या देण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. या धमक्यांमुळे संपूर्ण कुटुंब तणावाखाली असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.
लक्ष्मण मिसाळ यांनी आपल्या तक्रारीसोबत काही ऑडिओ रेकॉर्डिंग, कॉल रेकॉर्डिंग तसेच अन्य पुरावे पोलिसांकडे सादर केल्याचा दावा केला आहे. या पुराव्यांची सत्यता आणि त्यातील मजकुराची पडताळणी तपासादरम्यान केली जाणार असल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून देण्यात आली आहे. सध्या या प्रकरणाचा तपास विष्णूनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राम चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. दरम्यान, एफआयआरमध्ये करण्यात आलेल्या आरोपांची सत्यता, सादर करण्यात आलेले पुरावे आणि संबंधित व्यक्तींची भूमिका याबाबत पोलिसांकडून तपास केला जात असून, तपासानंतरच संपूर्ण सत्य समोर येणार आहे.
पोलिस आत्महत्या! प्रेमाचे दोन शब्द कधी तरी बोलली असती, तर..
पोलिस निरीक्षकाने आत्महत्या करणार असल्याचं पत्र लिहिलं पोलिस महासंचालकांना…
लातूर! पोलिस अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून युवकाची आत्महत्या…
पुणे वाहतूक शाखेतील पोलिसाची गळफास घेऊन आत्महत्या…
मुंबईत पोलिस कर्मचाऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या…

