
पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील लाचखोर उपनिरीक्षकाच्या घरात मिळालं घबाड…
पुणे : पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेल्या प्रमोद रवींद्र चिंतामणी (वय ४४, रा. सोपान रेसिडेन्सी, गंगोत्री पार्क, दिघी रोड, भोसरी; मूळ रा. कर्जुले हरियाळ, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर) या पोलिस उपनिरीक्षकाला तब्बल ४६ लाख ५० हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रविवारी (ता. २) रंगेहात पकडले आहे.
एसीबीच्या पथकाने सापळा रचून रविवारी प्रमोद चिंतामणी याला लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. त्यानंतर सोमवारी (ता. ३) त्याच्या घराची झाडाझडती घेण्यात आली. या तपासादरम्यान ५१ लाख रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. या पैशांसह दागिने आणि मालमत्तेची कागदपत्रे देखील एसीबीने जप्त केली आहेत. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षकांची देखील एसीबीकडून चौकशी केली जाणार आहे. एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, चिंतामणी याने २ कोटी रुपयांची लाच तक्रारदाराला मागितली होती. त्या लाचेचा पहिला हप्ता घेताना एसीबीने त्याला रंगेहाथ पकडले. याप्रकरणी समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
प्रमोद रवींद्र चिंतामणी याच्या घराच्या झाडाझडतीत मिळालेल्या रोख रकमेसह अन्य कागदपत्रांची सोमवारी रात्री उशिरापर्यंत मोजणी सुरू होती. एखाद्या पोलिस उपनिरीक्षकाच्या घरात एवढी मोठी रोकड आढळून येण्याची ही पहिलीच वेळ आहे. चिंतामणी याने लाचेची मागणी करताना १ कोटी त्याच्यासाठी व १ कोटी वरिष्ठ पोलिस निरीक्षकांसाठी मागितले होते, त्यामुळे त्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांचीही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी केली जाणार आहे.
दरम्यान, आर्थिक गुन्हे शाखांमध्ये कोट्यवधी रुपयांच्या गुंतवणूक फसवणुकीचे गुन्हे तपासाधीन असतात. मात्र, कागदपत्रे गुंतागुंतीची असल्याचे कारण देत अनेकदा गुन्हा दाखल करण्यात टाळाटाळ केली जाते. काही प्रकरणांमध्ये गुन्हा नोंदविल्यानंतरही आरोपींवर कारवाई करताना फिर्यादींना विविध मार्गांनी त्रास दिला जातो, अशाही तक्रारी वारंवार पुढे येत असतात. आरोपींना सूट देण्याच्या किंवा तपासात सवलत देण्याच्या नावाखाली मोठ्या रकमा मागितल्या जातात, असा आरोपही अनेकांनी केला आहे.
तहसीलदाराला लाच घेताना पकडले रंगेहाथ; रक्कम टाकली शौचालयात…
पोलिस दलात खळबळ! लाचखोर एपीआय, पीएसआयसह तिघांवर गुन्हा दाखल…
साताऱ्यात लाच घेणाऱ्या न्यायाधीश प्रकरणात नवा ट्विस्ट, पोलिस अधिकारी…
लाचखोर पोलिस निरीक्षकाच्या घरात सापडलं मोठं घबाड…
पिंपरी-चिंचवड पोलिस दलात निघाली 322 पदांची भरती, अर्ज भरण्याची शेवटची तारीख…

