
मुंबई रेल्वे अपघातात जवानाच्या मृत्यूने अनेकांच्या अश्रूचा फुटला बांध…
मुंबई : मुंबई येथे लोकल ट्रेनमधून पडून झालेल्या अपघातात बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यातील जुमडा गावचे रहिवासी आणि जीआरपीमधील जवान विकी बाबासाहेब मुख्यदल (वय 33) यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त येताच जुमडा गावावर शोककळा पसरली. पुढच्याच आठवड्यात मुलाचा तिसरा वाढदिवस असल्याने उत्साहात असलेल्या विकीच्या घरावर दुःखाचा डोंगर कोसळला. विकीच्या मृत्यूची वार्ता सर्वांच्या काळजाला चटका लावून गेली.
विकी मुख्यदल हे कर्तव्यावर जात असताना मुंब्रा आणि दिवा स्थानकादरम्यान लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे असताना, समोरून आलेल्या दुसर्या लोकल ट्रेनमधील प्रवाशांशी झालेल्या धडकेत त्यांचा तोल जाऊन ते ट्रेनमधून खाली पडले. विकी मुख्यदल हे ठाणे जीआरपी विभागात कार्यरत होते. त्यांच्या मृत्यूची बातमी समजताच जुमडा गावात शोककळा पसरली असून कुटुंबियांसह संपूर्ण गाव हळहळ व्यक्त करत आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन भाऊ आणि एक मुलगा असा परिवार आहे.
मितभाषी, मित्रांमध्ये पटकन रुळणारा, कर्तव्य बजावताना जिवाची बाजी लावणारा विकी मुख्यदल यांच्या मृत्युमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. कष्टाच्या जीवावर जालना येथून पोलिस भरतीची परीक्षा उत्तीर्ण होऊन चार वर्षांपूर्वी विकी कल्याण रेल्वे पोलिसांत भरती झाले होते. नोकरीनंतर विवाह आणि गृहकर्ज काढून लोकग्राम परिसरातील सिंधू इमारतीत घरही घेतले. पत्नी दीपा आणि तीन वर्षांचा प्रणय अशा सुखी कुटुंबात राहणारा विकी कामात प्रामाणिक होता. अलीकडेच त्याची ठाणे रेल्वे पोलिस दलात बदली झाली होती.
सोमवारी नेहमीप्रमाणे सकाळी नऊ वाजता कामावर जाण्यासाठी घरातून बाहेर पडलेल्या विकीने पुढच्या आठवड्यात प्रणयच्या तिसऱ्या वाढदिवसाची जोमात तयारी सुरू केली होती. त्याचा स्वतःचा पाच जूनला वाढदिवस होता. मात्र, सोमवारी काळाने त्याच्यावर घाला घातला. प्रणयला वाढदिवसाचा केक भरविण्याच्या आधीच त्याला पोरका करून विकी निघून गेल्याचे सांगताना शेजाऱ्यांच्या अश्रूचा बांध फुटला. कल्याण स्थानकात रेल्वेचोराचा पाठलाग करून त्याला ट्रॅकमधून पकडून आणण्यासाठी त्याने जीवाची बाजी लावल्याची आठवण सांगताना त्याच्या सहकाऱ्यांचा कंठ दाटून आला. इमारतीतही ते सर्वांचा आवडते होते.
मुंबईत रेल्वे अपघात! पुष्पक एक्स्प्रेस ट्रेनमधून प्रवासी ट्रॅकवर पडले, 5 जणांचा मृत्यू…
दिल्ली रेल्वे स्टेशनवर चेंगराचेंगरी; कुंभस्नानासाठी जाणाऱ्या प्रवाशांचा मृत्यू…
मुंबईत प्रेमी युगलाने घेतली रेल्वे एक्सप्रेससमोर उडी…
जळगाव रेल्वे अपघातात ११ जणांचा मृत्यू; केवळ अफवा ठरले कारण…
Video: मुंबईच्या वांद्रे रेल्वे स्थानकात मोठ्या प्रमाणात चेंगराचेंगरी; पाहा जखमींची नावे…
मुंबईतील दादर रेल्वे स्टेशनवर पोलिसांची चाणाक्ष नजर गेली एका बॅगवर अन्…

