
दहा वर्षे वयाच्या मुलीने १८ महिन्यांच्या बाळाला सहाव्या मजल्यावरून फेकून दिले; दिंडोशी पोलिंसाकडून गुन्हा दाखल…
मुंबई: मुंबईतील गोरेगाव पूर्व परिसरात एका १० वर्षे वयाच्या अल्पवयीन मुलीने अवघ्या १८ महिन्यांच्या बाळाला इमारतीच्या सहाव्या मजल्यावरील डक्टमधून खाली फेकून दिले. या घटनेत बाळाचा मृत्यू झाला आहे. दिंडोशी पोलिसांनी या मुलीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
या संदर्भात अधिक माहिती अशी, की गेल्या १४ ऑक्टोबर रोजी रात्री गोरेगाव पूर्व येथील नागरिक निवारा (दिंडोशी) परिसरात असलेल्या शिवशाही प्रकल्पातील एक क्रमांकाच्या इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून या मुलीने बाळाला खाली टाकून दिले होते. या घटनेनंतरच्या सीसीटीव्ही फूटेजमध्ये ही मुलगी सायकल चालवत असल्याचे दिसते.
इमारतीमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात या मुलीने १८ महिन्यांच्या बाळाला उचलून डक्टमध्ये खाली फेकल्याचे स्पष्टपणे दिसून आले आहे. दिंडोशी पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला असून, मुलीला आणि तिच्या आईला ताब्यात घेण्यात आले आहे. जुन्या भांडणातून किंवा घर सोडून जावे यासाठी हा कट रचला असावा, असा संशय मृत बाळाच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. त्यात आरोपी मुलीच्या आईचाही सहभाग असू शकतो. प्रकरणाच्या या पैलूचाही पोलिस तपास करत आहेत.
बाळाला खाली फेकून दिल्यानंतर त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आरोपीच्या कुटुंबीयांकडून या घटनेचा सीसीटीव्ही फूटेज आणि अन्य पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. दिंडोशी पोलिसांनी सुरवातीला एडीआर दाखल केला आणि त्यानंतर सीसीटीव्ही फूटेज आणि तांत्रिक तपास करताना आरोपी मुलगी आणि तिच्या आईला ताब्यात घेऊन चौकशी केली. या प्रकरणांमध्ये बाल कल्याण समितीच्या तपासानंतर आणि निर्देशांनुसार, मुलीविरोधात बीएनएसच्या आरोपाखाली कलम १०३ (१) अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

