
बाबाजी दाते महिला सहकारी बँकेची फसवणूक प्रकरणी अटकपूर्व जामीन मंजूर…
घाटंजी/यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : यवतमाळ येथील बाबाजी दाते महिला सहकारी बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी दोन आरोपींचा अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे.
यवतमाळ येथील बाबाजी दाते महिला सहकारी बँकेची 10 कोटी रुपयाच्या वर फसवणूक केल्याप्रकरणी यवतमाळ सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक तथा बँकेचे अवसायक नानासाहेब चव्हाण, अनुपमा जगताप, अतुल जगताप, सचिन जगताप व दुय्यम निबंधक राजेंद्र वरटकर आदीं विरुद्ध फिर्यादी तथा बॅकेचे माजी उपाध्यक्ष ॲड. मनिषा कुळकर्णी यांच्या लेखी तक्रारीवरुन अवधुतवाडी पोलिस ठाण्यात भादंवि कलम 420, 120 (ब), 468, 471, 34 अंतर्गत गुन्हे नोंदविण्यात आले होते. दरम्यान, जिल्हा उपनिबंधक तथा बॅकेचे अवसायक नानासाहेब चव्हाण, अतूल जगताप यांचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा न्यायाधीश तथा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. ए. लउळकर यांच्या न्यायालयात दाखल करण्यात आला होता. तथापि, दोन्ही आरोपींचा अटकपूर्व जामीन शनिवारी मंजूर करण्यात आला. आरोपी नानासाहेब चव्हाण यांची बाजू ॲड. राजेश साबळे, ॲड. एस. एम. दुंगे यांनी मांडली. तर आरोपी अतूल जगतापची बाजू ॲड.अजय डाखोरे यांनी मांडली. अवधुतवाडी पोलिस स्टेशनचे ठाणेदार तथा पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर देवकते यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक रोहित चौधरी हे पुढील तपास करीत आहे.
यवतमाळ येथील बाबाजी दाते महिला सहकारी बँकेचे अवसायक, दुय्यम निबंधक व इतर आरोपींनी 10 कोटी रुपया पेक्षा अधिक रकमेचे थकीत कर्ज बुडविण्याच्या अप्रमाणित हेतूने कर्जासाठी तारण / गहाण स्थावर मालमत्तेचा कर्जमुक्त करण्याचा खोटा दस्त दुय्यम निबंधक यवतमाळ कार्यालयात संगणमताने नोंदवून थकीत कर्जदारांना कर्जमुक्त करुन बॅक, सभासद व ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी 5 आरोपी विरुद्ध अवधुतवाडी पोलिस ठाण्यात गंभीर स्वरुपाचे गुन्हे नोंदविण्यात आले होते. अवधुतवाडी पोलिस स्टेशनचे ठाणेदार तथा पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर देवकते यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक रोहित चौधरी हे पुढील करीत आहे.

