
महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख याला पंजाबमध्ये अटक…
चंदीगड (पंजाब): महाराष्ट्र केसरी जिंकणारा आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू सिकंदर शेख याला पंजाब पोलिसांनी शस्त्र तस्करी प्रकरणात अटक केली आहे. सीआयए (CIA) पथकाने पपला गुर्जर गँगला शस्त्र पुरवणाऱ्या रॅकेटचा भंडाफोड करत चार जणांना अटक केली असून त्यात सिकंदर शेखचाही समावेश आहे. यामुळे खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी आरोपींकडून 1 लाख 99 हजार रुपये रोख रक्कम, 5 पिस्तुलं, काही काडतुसे आणि स्कॉर्पिओ-एन व एक्सयूव्ही अशा दोन गाड्या जप्त केल्या आहेत. या प्रकरणी पंजाबमधील खरड येथील पोलिस ठाण्यात आर्म्स अॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एसएसपी हरमन हंस यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, ‘अटक करण्यात आलेले आरोपी हरियाणा आणि राजस्थानमध्ये सक्रिय असलेल्या विक्रम उर्फ पपला गुर्जर गँगशी थेट जोडलेले आहेत. हे आरोपी उत्तर प्रदेशातून शस्त्र आणून पंजाब आणि आसपासच्या भागात विक्री करत होते. तिघे आरोपी गुन्हेगार पार्श्वभूमीचे आहेत. मात्र, महाराष्ट्रातील सिकंदर शेख याचा गुन्हेगारी रेकॉर्ड आहे का, याची चौकशी करण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांशी संपर्क साधला गेला आहे. मुख्य आरोपी दानवीरवर हरियाणा, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये खून, दरोडा, एटीएम फोडणे, आर्म्स अॅक्टसह अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. तो पपला गुर्जर गँगचा सक्रिय सदस्य असून उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातून शस्त्रं आणून पंजाबमध्ये विकण्याचे काम करायचा. दानवीर आणि त्याचा साथीदार बंटी 24 ऑक्टोबर रोजी एक्सयूव्ही गाडीतून दोन पिस्तुलं घेऊन मोहालीत आले होते. ही शस्त्रं ते सिकंदर शेखकडे देणार होते, तर सिकंदरने ती नयागावच्या कृष्ण उर्फ हॅप्पीला देण्याचा प्लॅन केला होता. पोलिसांनी एअरपोर्ट चौकातून तिघांना पकडले आहे.’
दरम्यान, सिकंदर शेख हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा कुस्तीपटू असून त्याने आर्मीमध्ये क्रीडा कोट्यातून भरती घेतली होती. मात्र, काही काळानंतर त्याने नोकरी सोडली. तो बीए पदवीधर असून विवाहित आहे. गेल्या पाच महिन्यांपासून तो पंजाबमधील मुल्लांपुर गरीबदास येथे भाड्याच्या घरात राहत होता. पोलिसांच्या माहितीनुसार, तो शस्त्र तस्करी साखळीत मध्यस्थाची भूमिका बजावत होता. कोल्हापूरच्या नामांकित गंगावेश तालीममध्ये प्रशिक्षण घेतलेल्या आणि दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्र केसरी किताब पटकावलेल्या सिकंदर शेखच्या अटकेने कुस्ती विश्वात आणि संपूर्ण महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली आहे.
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणी मुख्यमंत्री फडणवीस यांचा मोठा निर्णय…
दैव बलवत्तर म्हणून वाचली मराठी अभिनेत्री थोडक्यात…
मुंबईच्या पवई भागात 17 मुलांना ओलीस ठेवणाऱ्याचा एन्काऊंटर…
नांदेड! युवकाची प्रेम प्रकरणातून मुलीच्या बापानं अन् भावानं केली हत्या…
पुणे शहरात एटीएसची कारवाई, उच्चशिक्षित IT इंजिनिअरला अटक…

