अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीने पत्नीच्या आत्महत्येनंतर केले तिच्या शरीराचे तुकडे; पुढे काय झाले…

वॉशिंग्टन: पत्नीने आत्महत्या केल्यानंतर तिच्या पतीने मृतदेहाचे तुकडे केले होते, अशी साक्ष अमेरिकेतील व्हर्जिनिया न्यायालयात देण्यात आली. भारतीय वंशाच्या नरेश भट याच्यावर पत्नीच्या हत्येचा आरोप आहे. साक्ष देताना भट याने न्यायालयात सांगितले, की त्याची पत्नी ममता भट हिने आत्महत्या केली आहे. ममताने गोळ्या आणि अत्यंत विषारी कीटकनाशक सेवन केल्यानंतर, ती पलंगाशेजारी उलट्यांनी माखलेल्या अवस्थेत बेशुद्धावस्थेत आढळल्या होत्या.

भट याची पत्नी ममता (वय २८) ही २०२४ मध्ये बेपत्ता झाली होती. तिच्या बेपत्ता होण्यामागे संभाव्य हत्या, मृतदेहाची विटंबना आणि मृतदेह लपवल्याचा आरोप पोलिसांनी नरेश भट याच्यावर ठेवला आहे. त्याची पत्नी २९ जुलै, २०२४ रोजी एका व्हीडिओ कॉलदरम्यान शेवटची दिसली होती. नरेशने हा आरोप नाकारला असून, करवतीने तिचा मृतदेह कापण्यापूर्वी तिच्यावर सीपीआर आणि जीव वाचवण्याचे उपाय केल्याचा दावा केला आहे. डब्ल्यूयूएसए (चॅनल ९) च्या वृत्तानुसार, भट्ट यांनी यानंतर आत्महत्या करण्याचा विचारही केला होता, असा दावाही केला आहे.

पत्नी बेशुद्ध अवस्थेत आढळल्यावर त्याने ९११ क्रमांकावर फोन का केला नाही, असे विचारल्यावर भट म्हणाला, की फोन का नाही केला हे आपल्याला माहीत नाही. फोन करण्याचा प्रयत्न केला. आपण खूप घाबरलो होतो. आपल्यावर कशाचा तरी अज्ञात ताबा आला होता.

त्याच्या खटल्याला पाच आठवडे उलटले असताना हा खळबळजनक दावा समोर आला आहे. विशेष म्हणजे त्याच्या पत्नीचा मृतदेह दोन वर्षांहून अधिक काळ बेपत्ता होता. ममता कामावर न आल्याने ५ ऑगस्ट रोजी ती बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. भटने सुरवातीला पोलिसांना सांगितले होते, की त्याची पत्नी बेपत्ता आहे यावर त्याचा विश्वास नाही. पण नंतर त्याने बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. २२ ऑगस्ट, २०२४ रोजी त्याला अटक करण्यात आली. पोलिसांना त्याच्या बेडरूम आणि बाथरूममध्ये रक्ताचे डाग आढळले होते. तपासादरम्यान पोलिसांना केसांचे तुकडे असलेली एक पॉवर सॉ (विद्युत करवत) देखील सापडली.

भट याने न्यायालयाला सांगितले, की २९ जुलै २०२४ रोजी संध्याकाळी ते त्यांच्या लहान मुलीसह रात्री ८ वाजण्याच्या सुमारास झोपायला गेले पण त्यांची पत्नी वर आल्याचे त्याला ऐकू आले नाही.

दुसऱ्या दिवशी पहाटे ४ च्या सुमारास तो बाथरूमला जाण्यासाठी उठला, तेव्हा त्याला ममता त्यांच्या पलंगाच्या पायथ्याशी पाठीवर पडलेली आढळली. तिच्याभोवती गोळ्यांनी भरलेली स्वतःचीच उलटी पसरलेली होती. त्याने असाही दावा केला, की तिच्या शेजारी ‘सेल्फॉस’ या प्राणघातक विषारी कीटकनाशकाचे एक पाकीट पडलेले होते.

भटच्या साक्षीनुसार, त्याने तिला एक तासभर पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न केला. जेव्हा ती मृत झाल्याचे स्पष्ट झाले, तेव्हा त्याने तिला उचलून त्यांच्या बाथरूममध्ये नेले.

जेव्हा ती मेली आहे हे स्पष्ट झाले, तेव्हा त्याने मृतदेह लपवून नंतर आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला, असे त्याने सांगितले. भटने दावा केला की, त्याचा पहिला विचार पत्नीचा मृतदेह पोटोमॅक नदीत फेकून देण्याचा होता, पण नंतर तो मृतदेह लपवण्यासाठी होम डेपोमध्ये गेला. पत्नीच्या मृत्यूनंतर आपण आत्महत्या करण्यासाठी सर्व साहित्य जमवले, पण प्रत्यक्षात आत्महत्या केली नाही, असा दावाही त्याने केला.

ममताचे संपूर्ण शरीर कचऱ्यात टाकण्याचा निर्णय घेतला होता, पण ते त्यात बसत नसल्याने त्याने करवतीने मृतदेह कापला. तिचे शरीर खाली वाकवून त्याचे तुकडे करण्याचा प्रयत्न केला. शरीरापासून पाय वेगळे केले. तथापि, तिच्या शरीराचे पूर्णपणे तुकडे करता आले नाहीत, असेही त्याने सांगितले.

भट याच्यावर असलेल्या तीन आरोपांपैकी, प्रथम श्रेणीतील हत्येचा गुन्हा सर्वांत गंभीर असून, त्यासाठी जन्मठेपेची शिक्षा आहे. परंतु, मृतदेह लपवणे आणि मृतदेहाची विटंबना करणे या इतर दोन आरोपांसाठी केवळ कमाल पाच वर्षांपर्यंतच्या तुरुंगवासाची शिक्षा आहे. गुन्हा कबूल करून भट आपली मृत्युदंडाची शिक्षा कमी करून घेऊ इच्छित आहेत, असा दावा सरकारी वकिलांनी केला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!