संजय गांधी उद्यानात घुसले वन्यप्राण्यांच्या बेकायदा शिकारीसाठी; मात्र गोळीबारात टोळीतील सदस्याचाच मृत्यू…

मुंबई: मोबाईल टॉर्चच्या प्रकाशाला वन्यप्राण्याचे डोळे समजून, केलेल्या गोळीबारात विजय सापटे (वय ६०) यांचा मृत्यू झाला आहे. या गोळीतून निघालेल्या छऱ्यांमुळे अन्य दोघे जण जखमी झाले आहेत. येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात वन्य प्राण्यांची बेकायदा शिकार करण्यासाठी सात जणांची एक टोळी घुसली होती.

या घटनेनंतर मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावण्यासाठी अंत्यसंस्कार करण्यात आला. मृत्यूची प्रत्यक्ष तपासणी न करता व्हीडिओ कॉलद्वारे डॉक्टरने प्रमाणपत्र दिल्याचा गंभीर प्रकारही समोर आला आहे. या प्रकरणी काशिगाव पोलिसांनी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, महेश अनंत गायकर (वय ५२) आणि काठोड लाबड (वय ५५) या दोघांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी चेनागाव परिसरातील डेबुचा घाट भागात शिकारीसाठी सात जण गेले होते. त्यांच्याकडे छऱ्यांची बंदूक आणि ठासणीच्या दोन बंदुका होत्या. रात्री साडेनऊच्या सुमारास जंगलात विखुरलेल्या या टोळीतील एका व्यक्तीच्या मोबाईलचा प्रकाश दिसला. हा प्रकाश म्हणजे एखाद्या वन्यप्राण्याचे डोळे असल्याचा समज करून महेश गायकरने आपल्या दुनळीच्या छऱ्यांच्या बंदुकीतून गोळीबार केला. मात्र, बंदुकीतून निघालेले छर्रे विजय सापटे यांच्या छातीला व पायाला लागले. या गोळीबारात कल्पेश डगला आणि कुणाल शेलार हेही जखमी झाले.

गोळीबारानंतर जखमी विजय सापटे यांना त्यांच्या साथीदारांनी जंगलातून बाहेर आणले. त्यांना उपचारांसाठी घेऊन जात असताना त्यांचा मृत्यू झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांना पुन्हा घरी आणण्यात आले. दरम्यान, जखमी कल्पेश डगला याला उपचारासाठी काशिगाव येथील आशिष रुग्णालयात नेण्यात आले. त्याचवेळी विजय सापटे यांच्या मृत्यूची माहिती पोलिसांना न देता, व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉलद्वारे डॉक्टरांना मृतदेह दाखवून मृत्यूची कागदपत्रे मिळविण्यात आल्याचा आरोप आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!