
सलमान खानसोबतचा वाद संपलेला नाही; त्याच्याबरोबर काम करणाऱ्यांना संपवू – लॉरेन्स बिश्नोईची पुन्हा धमकी…
मुंबई: रविवारी मुंबईत टायगर श्रॉफवर झालेल्या हल्ल्यानंतर काही मिनिटांतच, एक ध्वनिफीत सोशल मीडियावर प्रसारित होऊ लागली. त्यात लॉरेन्स बिश्नोईचा साथीदार अनिल पंडितने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. तो म्हणाला, ‘मी अनिल पंडित, लॉरेन्स बिश्नोईचा धाकटा भाऊ आहे. आज मुंबईत टायगर श्रॉफसोबत जे घडले, त्याची जबाबदारी मी आणि हरमन संधू घेतो’.
या ध्वनिफीतीमध्ये अनिलने असा दावा केला, की टायगरला सलमानपासून दूर राहण्याचा इशारा देण्यात आला होता. टायगर मूर्ख आहे. त्याला समजले नाही, की चित्रपटसृष्टीत जो कोणी सलमान खानसोबत काम करेल, त्याला आम्ही ठार मारू. हा पहिला आणि शेवटचा इशारा आहे.’ त्यानंतर तो सलमानला उद्देशून म्हणाला, ‘जर तू माझा मोठा भाऊ लॉरेन्स बिश्नोई किंवा बिश्नोई समाजाची माफी मागितली नाहीस, तर आम्ही तुझे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त करू.’
या टोळीच्या हालचालींवर लक्ष ठेवणारे पोलीस अधिकारी सांगितले, की हल्ल्यानंतर जबाबदारी स्वीकारण्याची ही पद्धत आता परिचित झाली आहे. आधी हल्ला केला जातो, मग सोशल मीडिया पोस्टद्वारे जबाबदारी स्वीकारली जाते. त्यानंतर गुन्हेगारांचा आयपी ॲड्रेस ब्लॉक करण्यासाठी प्रॉक्सी ॲप्सचा वापर केला जातो आणि मग ही माहिती इतर माध्यमांतून पसरवली जाते. फेब्रुवारीमध्ये, चित्रपट निर्माता रोहित शेट्टी यांच्या घरावर गोळीबार झाल्यानंतर, एका टोळीने फेसबुक पोस्टद्वारे या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती.
टायगर श्रॉफ आणि सलमान खान यांच्या विरोधात दिलेल्या धमक्या, लॉरेन्स बिश्नोई याने गुजरातमधील तुरुंगात जाण्यापूर्वी दिलेल्या धमकीची आठवण करून देते. आम्ही जोधपूरमध्ये सलमान खानला ठार मारू. हे सर्वांना कळेल, असे त्याने २०१८ मध्ये पहिल्यांदा सोशल मीडियावरून जाहीर केले होते. हल्ल्यांची ही जाहीर जबाबदारी स्वीकारणे, १९९० च्या दशकातील मुंबईच्या गुन्हेगारी जगताची आठवण करून देते. त्या काळात, गुन्हेगारी टोळ्या दूरचित्रवाणी वाहिन्यांना मुलाखती देऊन गोळीबाराची जबाबदारी स्वीकारत असत.
कोण आहे लॉरेन्स बिश्नोई?
लॉरेन्स बिश्नोई अंदाजे ३० वर्षांचा आहे. तो पंजाबच्या फिरोजपूर जिल्ह्यातील अबोहरजवळील एका गावचा रहिवासी आहे. तो बिश्नोई समाजाचा असून, २०२२ मध्ये झालेल्या पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येतील प्रमुख आरोपींपैकी एक आहे. तो सध्या साबरमती तुरुंगात आहे.
चंडीगडमधील विद्यार्थी राजकारणाच्या माध्यमातून त्याने गुन्हेगारीच्या जगात प्रवेश केला. लॉरेन्स बिश्नोईविरुद्ध पहिला ‘एफआयआर’ हत्येच्या प्रयत्नासाठी दाखल करण्यात आला होता. त्यानंतर, एप्रिल २०१० मध्ये, त्याच्याविरुद्ध घरात घुसल्याचा आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला. सध्या त्याच्यावर हत्येचा प्रयत्न, कार जॅकिंग, खंडणी, हिसकावून घेणे आणि शस्त्र कायद्याशी संबंधित २० हून अधिक प्रकरणांमध्ये खटला सुरू आहे. गेल्या वर्षी, राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) त्याला अनेक वेळा ताब्यात घेतले होते.
सलमान खानसोबत वैर असण्याचे कारण काय?
१९९८ च्या काळवीट शिकार प्रकरणात सलमान खानचे नाव समोर आल्यानंतर, लॉरेन्स बिश्नोई टोळीने त्याला लक्ष्य करण्यास सुरुवात केली. ‘हम साथ साथ हैं’ या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान, जोधपूरजवळील मथानियाच्या बावड परिसरात आपल्या सहकलाकारांसोबत चिंकाराची शिकार केल्याचा आरोप सलमानवर होता. त्याच्यावर घोडा फार्ममध्ये दुसऱ्या चिंकाराची शिकार केल्याचाही आरोप होता. यानंतर, बिश्नोई समाजाच्या सदस्यांनी सलमान आणि त्याच्या सहकलाकारांविरुद्ध तक्रार दाखल केली. संरक्षित वन्यजीवांची शिकार केल्याबद्दल सलमानला अटकही करण्यात आली होती, परंतु नंतर त्याला जामीन मंजूर झाला. बिश्नोई समाजात काळवीट अत्यंत पवित्र मानले जाते.
जानेवारी २०१८ मध्ये, जोधपूरमधील एका स्थानिक न्यायालयाबाहेर लॉरेन्स बिश्नोई म्हणाला होता, की सलमान खानला इथेच जोधपूरमध्ये मारले जाईल. त्यानंतर त्याला आमची खरी ओळख कळेल. त्याच वर्षी, बिश्नोईचा जवळचा सहकारी, संपत नेहराने, सलमानच्या घराची पाहाणी केल्याचा दावा केला होता. गेल्या चार वर्षांत सलमानला अनेक वेळा जिवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. मुंबई पोलिसांच्या अधिकाऱ्यांच्या मते, लॉरेन्सला मुंबईतील आपली पकड मजबूत करायची आहे.

