
पुणे-बंगळुरू महामार्गावरील सिनेस्टाईल लूट; कुरिअर कंपनीच्या व्हॅनमधून दीड कोटींचा ऐवज लंपास; १२ तासांत लुटारू गजाआड…
साताराः पुणे-बंगळुरू महामार्गावर कुरिअर कंपनीची व्हॅन अडवून सिनेस्टाईल दरोडा घालून, सुमारे दीड कोटी रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास करणाऱ्या आठ जणांच्या टोळीला पोलिसांनी अवघ्या १२ तासांत जेरबंद केले. एका कुरिअर कंपनीत कामाला असलेल्या कर्मचाऱ्यानेच दरोड्याचा कट आखल्याचे तपासात समोर आले. दोन डीवायएसपी, सात एपीआय, पीएसआय दर्जाच्या अधिकाऱ्यांसह तब्बल ७० पोलिसांनी अहोरात्र तपास करून या गुन्ह्याचा छडा लावला.
सातारचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी पत्रकार परिषद बोलताना म्हणाले, की कोल्हापुरातील मार्क एक्सप्रेस कुरिअर कंपनीची महिंद्रा बोलेरो पिकअप (एमएच ०९ एफएल ५४२३) ही गाडी शुक्रवारी पहाटे पुण्याहून कोल्हापूरकडे निघाली होती. दरोडेखोरांनी खेडशिवापूर टोलनाक्यापासून पाठलाग करत सातारा जिल्ह्यातील कवठे (ता. वाई) हद्दीत मोटारसायकली आडव्या घालून पिकअप व्हॅन थांबवली. वाहनचालकास कोयत्याचा धाक दाखवून गाडीतील सोन्या-चांदीच्या दागिन्यांचे पोते घेऊन संशयित पसार झाले.
महामार्गावरील या धाडसी दरोड्याची भुईंज पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल होताच पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, डीवायएसपी विपुल पाटील, परिविक्षाधीन डीवायएसपी पूनम झगडे, एलसीबीचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके घटनास्थळी दाखल झाले. तपासासाठी पोलीस अधीक्षकांनी संपूर्ण सातारा जिल्ह्यातील पोलिसांची वेगवेगळी पथके तयार केली. या पथकांनी सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल लोकेशनचे तांत्रिक विश्लेषण केले.
तपास सुरू असतानाच एलसीबीचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांना खबऱ्याने महत्त्वाची माहिती दिली. मंगेश एकनाथ जाधव, हृतिक रमेश कदम, सोमनाथ प्रमोद गोडसे (रा. मालगाव, ता. जि. सातारा) आणि त्यांच्या ५ साथिदारांच्या हालचाली संशयास्पद असल्याची माहिती मिळताच, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यापैकी गोपीनाथ तानाजी कदम (रा. मालगाव, ता. जि. सातारा) हा कराडमध्ये कुरिअर कंपनीमध्ये कामाला असल्याने, मार्क एक्सप्रेस कुरिअर कंपनीची गाडीच्या येण्या जाण्याची माहिती त्याला होती, असे त्याने सांगितले.
पुण्याहून १६ ऑक्टोबरला कोल्हापूरला जाणाऱ्या व्हॅनमध्ये सोन्या-चांदीचा मौल्यवान ऐवज असल्याची माहिती मिळताच गोपीनाथ कदम, मंगेश एकनाथ जाधव, हृतिक रमेश कदम, आदित्य हणमंत कदम, सोमनाथ प्रमोद गोडसे, निखील दिलीप कदम, अक्षय शांताराम मोझर, निषीध शरद साबळे यांनी दरोड्याचा कट रचला. हृतिक कदम व आदित्य कदम यांनी पल्सर मोटार सायकलवरुन खेड-शिवापूर टोलनाका येथून गाडीचा पाठलाग केला.
बाकीचे संशयित आरोपी वेगवेगळ्या कंपनीच्या दुचाकीवरून पाठलाग करत आले. वाई तालुक्यातील कवठे गावच्या हद्दीत व्हॅनला मोटारसायकल आडवी घातली. चालकास कोयता दाखवून मारहाण केली. गाडीचा मागचा दरवाजा उघडून मौल्यवान ऐवज लुटून आरोपी पसार झाले. या दरोड्यात तब्बल १ कोटी ५५ लाख २७ हजार रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने व चांदीच्या विटा चोरीला गेल्या होत्या. परंतु, गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन सातारा जिल्हा पोलीस दलाने अवघ्या १२ तासांत या दरोड्याचा छडा लावला.

