
आंदोलनात गैरवर्तनप्रकरणी महिला पत्रकाराची राहुल गांधी यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल…
नवी दिल्ली: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह इतर अनेकांविरोधात प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) नोंदवण्याची मागणी करत, नवी दिल्ली जिल्ह्याचे पोलीस उपआयुक्तांकडे (डीसीपी) पत्रकार रिचा पराशर यांनी औपचारिक फौजदारी तक्रार दाखल केली आहे.
ही तक्रार १२ ऑक्टोबर रोजी घडलेल्या एका घटनेशी संबंधित आहे. त्या सर्वोच्च न्यायालय परिसराजवळ राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनाचे वार्तांकन करत होत्या. सोमवारी निषेध मोर्चादरम्यान सर्वोच्च न्यायालयातून बाहेर पडताना झालेल्या गोंधळात, राहुल गांधी आणि त्यांच्या सुरक्षारक्षकांनी आपल्याला धक्काबुक्की केली आणि हिंसकपणे ढकलले, असे त्यांनी सांगितले. या घटनेमुळे तीन महिन्यांच्या गरोदर असलेल्या पराशर यांना शारीरिक दुखापत झाली आणि एक धक्कादायक वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली.
त्या म्हणाल्या, “माईक लावल्यानंतर अवघ्या दोन सेकंदात ही घटना घडली. माझ्या व्हीडिओमध्ये ते स्पष्टपणे दिसते. राहुल गांधी पुढे आले आणि त्यांनी माझा हात धरून ओढला. त्यावेळी मला त्यांच्या शक्तीची जाणीव झाली. त्यांनी ओढले आणि त्याच क्षणी त्यांच्या अंगरक्षकांनी मला ढकलून दिले. इंटरनेटवर प्रसृत केलेल्या व्हीडिओमध्ये ते स्पष्टपणे दिसते. माझा फोन फुटला. मी ओरडत होते, सर, मला ढकलले जात आहे. सर, आम्ही निघत आहोत. कृपया ढकलू नका. त्याचवेळी मला ढकलण्यात आले. सर्वोच्च न्यायालयात पायऱ्या होत्या आणि मी पायऱ्यांवर पडले.”
पत्रकाराने एका हृदयद्रावक दृश्याचे वर्णन केले आहे, जिथे त्यांच्या सुरक्षेसाठी केलेल्या विनवण्यांकडे केवळ दुर्लक्षच केले गेले नाही, तर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ‘राहुल गांधी जिंदाबाद’च्या घोषणा देऊन त्या विनवण्या जाणीवपूर्वक दाबून टाकल्या.
“मी पडले, फोन पडला, पण मायक्रोफोन माझ्या कॉलरला असल्याने ते रेकॉर्ड झाले. मी उठून ओरडत होते, माझा मायक्रोफोन पडला आहे आणि त्यांचे लोक मला विचारत होते, अहो, तुम्ही कुठे पडलात? मी म्हणाले, ते माझ्या कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाले आहे. तुम्ही एका पत्रकाराचा आवाज दाबू शकत नाही. मी मोठ्या गर्दीत उभी होते आणि मला श्वास घेता येत नव्हता. त्यानंतर, मी तिथे सांगत होते की राहुल गांधींनी मला ढकलले. ते माझ्या अगदी मागेच होते. आणि माझा आवाज दाबण्यासाठी त्यांचे लोक राहुल गांधी जिंदाबाद, अशा घोषणा देत होते,” असा दावा त्यांनी केला.
“मी बसून रडत होते. मी कॅमेऱ्यासमोर ओरडले आणि मग बसून रडू लागले. कारण, गरोदरपणाच्या पहिल्या तिमाहीत एक स्त्री म्हणून, परिस्थिती काय असेल हे मला माहीत नव्हते. मी पोटावर पडले,” असे त्यांनी पुढे सांगितलं.
रिचा पराशर अखेर दिल्लीच्या गंगाराम हॉस्पिटलच्या इमर्जन्सी रूममध्ये पोचल्या. तिथे त्यांच्या जखमांवर उपचार करण्यात आले.

