मुंबईतील वांद्रे, खार व सांताक्रूझमधील अंमली पदार्थ तस्करांशी संबंधित असलेल्यांच्या बांधकामांवर बुलडोझर कारवाई…

मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्याने मुंबई पोलिसांनी वांद्रे, खार, सांताक्रूझ आणि अंधेरी पश्चिम परिसरातील अंमली पदार्थ तस्करांशी संबंध असलेल्या अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर कारवाई केली आहे. यापैकी बहुतेक बांधकामे अनधिकृत आणि अतिक्रमण केलेली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली.

यासंदर्भात पश्चिम प्रादेशिक विभाग दोनचे पोलीस उपायुक्त डॉ. मोहित कुमार म्हणाले, की अमली पदार्थ विक्रीविरोधातील मोहिमेचा भाग म्हणून विक्रेत्यांशी संबंधित अनधिकृत आणि अतिक्रमण केलेल्या बांधकामांची ओळख पटवून ती कारवाईसाठी मुंबई महापालिकेच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर महापालिकेने संबंधित बांधकामे पाडली. अंमली पदार्थांशी संबंधित कारवाया खपवून घेतल्या जाणार नाहीत, असा स्पष्ट संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे. भविष्यातही अशा मोहिमा सुरू राहतील आणि अमली पदार्थ विक्रीत सहभागी असलेल्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल.

वांद्रे पोलिसांनी महापालिकेच्या मदतीने अलिकडेच राहुल नगर झोपडपट्टी परिसरातील, रंगशारदा सभागृहाजवळ असलेली दोन अनधिकृत बांधकामे पाडली. ही बांधकामे हसन हैदर अली शेख आणि फातिमा अल्ताफ शेख या दोघांशी संबंधित असल्याचा पोलिसांचा आरोप आहे. दोघेही किशोरवयीन आहेत. तसेच वांद्रे पश्चिम येथील एस. व्ही. रोडवरील जामा मशिदीजवळील मौलाना बाबा गल्ली परिसरात निलोफर हाफिज शेख आणि बडा शानू या टोपणनावाने ओळखला जाणारा शहनवाज नासिर कुरेशी यांच्याशी कथित संबंध असलेले आणखी एक बांधकाम पाडण्यात आले. खार पोलीस ठाण्याच्या हद्दीत सेलिना हसमुख पटेल नावाच्या महिलेच्या निवासस्थानाजवळील अनधिकृत भिंत आणि पत्र्याचे शेड महापालिकेने हटवले. पोलिसांच्या माहितीनुसार, या महिलेविरोधात यापूर्वी एनडीपीएस कायद्यांतर्गत तीन गुन्हे आणि गांजाच्या कथित विक्रीशी संबंधित एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

१४ ऑक्टोबर रोजी अंधेरी पश्चिम येथील डी. एन. नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतही अशीच कारवाई करण्यात आली. अंमली पदार्थ विक्रीच्या आरोपाखाली असलेल्या असिफ इक्बाल खान ऊर्फ चुहा याने उभारल्याचा आरोप असलेले पत्रे आणि ताडपत्रीचे अनधिकृत शेड पोलिसांनी महापालिकेच्या मदतीने हटवले. यासंदर्भात पोलिसांनी महापालिकेशी पत्रव्यवहार केला होता.

खान याच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या (बीएनएस) कलम १११ अंतर्गत तसेच एनडीपीएस कायद्याच्या कलम ८(अ), २२(ब) आणि २९ अंतर्गत गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. या तरतुदी अनुक्रमे संबंधित गुन्हेगारी कृत्ये, अमली पदार्थांचे बेकायदेशीर उत्पादन, ताबा, विक्री व वाहतूक तसेच गुन्हेगारी कटाशी संबंधित आहेत. बांधकाम पाडण्याच्या दोन दिवस आधीच खान याची जामिनावर सुटका झाली होती. त्याने पुन्हा अंमली पदार्थ विक्री सुरू करू नये, हा या कारवाईमागील उद्देश असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ऑगस्टमध्ये सांताक्रूझ पोलिसांनीही अशाच प्रकारची कारवाई केली होती. सांताक्रूझ पश्चिम येथील राजेश खन्ना उद्यानाजवळील मुरुगन चाळीत राहणाऱ्या अंबिका हरजन आणि दुर्गा पांडे यांनी उभारलेल्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली होती. या दोघींकडून १७ ग्रॅम ब्राऊन शुगर जप्त करण्यात आली असून, तिची किंमत सुमारे २.५५ लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!