
तुकाराम मुंढेंच्या दौऱ्यापूर्वी एफडीएची सातारा व कराडमध्ये मोठी कारवाई; ब्लिंकइटला दणका, दिवेकर बेकरी सील…
साताराः अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे शनिवारी कराडमधील शारदीय व्याख्यानमालेत तरूणाईशी संवाद साधणार आहेत. त्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर एफडीएच्या पथकाने मोठी कारवाई केली आहे. कराड शहरातील प्रसिद्ध दिवेकर बेकरी तसेच पार्सल सेवा पुरविणाऱ्या ‘ब्लिंकइट’च्या सातारा आणि कराड कार्यालयांवर छापा घालून परवाना निलंबित केला आहे.
कराड नगरपालिकेच्या शारदीय व्याख्यानमालेला यंदा नगरपालिकेने एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांना खास आमंत्रित करण्यात आले आहे. तरुणांना भावी आयुष्यात एक दिशा मिळावी, या उद्देशाने त्यांचे ‘तरुणाईशी संवाद’ या विषयावर व्याख्यान ठेवण्यात आले आहे.
एफडीएच्या आयुक्त पदाचा चार्ज घेतल्यापासून तुकाराम मुंढेंनी कारवाईचा धडाका लावला आहे. आता खुद्द मुंडेच साताऱ्यात येणार असल्याने अन्न व औषध प्रशासन विभाग क्रियाशील झाला. त्यांनी कराडमध्ये झाडाझडती घेत प्रसिद्ध आस्थापनांना दणका दिला. बेकरी व्यवसायातील प्रसिद्ध असणाऱ्या दिवेकर बेकरीवर छापा घालून, अस्वच्छतेच्या कारणावरून विक्रीचा परवाना तात्पुरता निलंबित केला आहे.
एफडीएने पार्सल सेवा पुरविणाऱ्या ब्लिंकइट सारख्या कंपनीवरही कारवाई केली आहे. ब्लिंकइटच्या स्टोअरमध्ये झाडाझडती घेऊन एफडीएच्या अधिकाऱ्यांनी सुधारणा करण्याचे निर्देश दिले. सुधारणा होईपर्यंत पार्सल सेवेवर निर्बंध घातले. त्याचबरोबर दोन्ही आस्थापनांना सुधारणा करण्याची नोटीस देखील बजावली आहे
सहाय्यक आयुक्त तुषार शिंगाडे यांच्याशी संपर्क साधला असता, कराड शहरातील दोन आस्थापनांवर कारवाई केल्याची माहिती त्यांनी दिली. दिवेकर बेकरीमध्ये अस्वच्छता असल्याबाबत अन्न व औषध प्रशासनाच्या विभागाकडे तक्रार प्राप्त झाली होती. त्यानुसार बेकरीची तपासणी करण्यात आली. अस्वच्छता तसेच अन्य काही त्रुटी आढळून आल्यामुळे, पुढील आदेशापर्यंत मिळेपर्यंत बेकरी सील केल्याचे त्यांनी सांगितले.
पार्सल सेवा पुरविणाऱ्या ब्लिंकइट कंपनीच्या कराड व सातारा येथील कार्यालयांवरही छापा घालण्यात आला. त्यावेळी कंपनीच्या डिलिव्हरीमध्ये अनियमितता आढळून आली. म्हणून त्यांचा परवाना तात्पुरता निलंबित करण्यात आला आहे. संबंधित आस्थापनेला सुधारणा करण्याची लेखी सूचना केली आहे, असे शिंगाडे यांनी सांगितले. दरम्यान, तुकाराम मुंढे यांच्या दौऱ्यामुळे सातारा आणि कराड शहरांतील फुटपाथवर दिसणाऱ्या खाद्यपदार्थांचे हातगाड्या गायब झाल्या आहेत.

