दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसवेवर कोटाजवळ टेम्पो ट्रॅव्हलर नाल्यास कोसळून ७ जण मृत्यूमुखी, तर १० जण जखमी…

कोटा: चालकाचे नियंत्रण सुटून एक टेम्पो ट्रॅव्हलर बस पुलावरून २० फूट खोल नाल्यात कोसळून झालेल्या अपघातात, ७ प्रवासी मृत्यूमुखी पडले असून १० प्रवासी जखमी झाले आहेत. ही बस मध्य प्रदेशातून राजस्थानातील जयपूरच्या दिशेने जात होती. कोटा जिल्ह्यातील सीमलिया पोलिस ठाण्याच्या हद्दीत आज (ता. १७) सकाळी ही दुर्घटना घडली, असे पोलिसांनी सांगितले.

सीमलिया पोलीस ठाण्याचे अधिकारी नंद सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रॅव्हलरने कराडिया टोल प्लाझा पार केला होता. त्यानंतर ती सुलतानपूरच्या दिशेने जात होती. याचदरम्यान वेगात असलेल्या चालकाला अचानक डुलकी लागली. वाहनाचा वेग जास्त असल्याने त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ती पुलाचा कठडा तोडून नाल्यात कोसळली.

अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की, ट्रॅव्हलरच्या पुढील भागाचा पूर्णपणे चक्काचूर झाला. वाहनातील प्रवाशांमध्ये आरडाओरडा सुरू झाला. या दुर्घटनेत ७ जणांचा मृत्यू झाला आहे. अन्य दहा जखमींना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार चालू आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.

जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सुमारे २० फूट खोल नाल्यात कोसळलेल्या ट्रॅव्हलरमधील प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. जखमींना रुग्णवाहिकेतून वैद्यकीय महाविद्यालयाच्या नवीन रुग्णालयात आणि एमबीएस रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.

अपघाताचा आवाज ऐकताच परिसरातील ग्रामस्थ आणि रस्त्यावरून जाणारे प्रवासी मदतीसाठी घटनास्थळी धावले. माहिती मिळताच सीमलिया पोलीस, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (एनएचएआय) बचाव पथकासह रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. प्रवाशांना बाहेर काढताना बचाव पथकाला मोठी कसरत करावी लागली. पोलिसांनी आणि बचाव पथकाने एकेक प्रवाशाला नाल्यातून बाहेर काढले. त्यानंतर जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आलं.

सुलतानपूरचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश सामर यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघाताची माहिती मिळताच त्यांनी ब्लॉकमधील चार रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी पाठवल्या. ट्रॅव्हलरमध्ये सुमारे २० प्रवासी होते. त्यापैकी बहुतांश जण झोपेत होते. पुलावरून खाली कोसळल्यानंतर ट्रॅव्हलर वेगाने नाल्याच्या भिंतीवर आदळली आणि तिथेच अडकली. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) तातडीने क्रेन मागवून ट्रॅव्हलर नाल्यातून बाहेर काढली.

या अपघातात चार प्रवाशांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी झालेल्या अन्य तीन जणांचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. जखमींपैकी अनेकांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचे रुग्णालयांतील डॉक्टरांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!