बेपत्ता मुलगा मृत समजून केले अंत्यसंस्कार; काही दिवसांनी आला फोन, ‘तो जिवंत आहे’…

कपुरथळाः मुलगा घरातून बेपत्ता झाल्यामुळे कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार नोंदविली. पोलिसांनी तक्रार नोंदवून तपास सुरू केला. काही दिवसांतच पोलिसांना एक बेवारस जळालेला मृतदेह सापडला. त्यांनी ओळख पटविण्यासाठी बेपत्ता मुलाच्या कुटुंबीयांना पाचारण केले. हा आपला मुलगा रवी कुमारच आहे, अशी कुटुंबीयांनी ओळख पटविल्यानंतर पोलिसांनी तो मृतदेह त्यांच्या ताब्यात दिला. त्याच्यावर रीतसर अंत्यसंस्कारही करण्यात आले. मुलगा गेल्याच्या दुःखतून कुटुंबीय सावरत असतानाच, कपुरथळा जिल्हा मध्यवर्ती कारागृहातून एक फोन येतो आणि संपूर्ण प्रकरणाला एक अनपेक्षित वळण मिळले. प्रत्यक्षात रवी कुमार मरण पावलेला नव्हता, तर तो होता तुरुंगात! पंजाबमधील कपुरथळा येथे हा अविश्वसनीय प्रकार घडला आहे.

रवी कुमार ५ ऑगस्ट रोजी घरातून बाहेर पडला होता. मात्र, त्यानंतर तो घरी परतलाच नाही. वडील आणि भावाने नातेवाईक, मित्र तसेच इतर ठिकाणी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा कोणताही सुगावा लागला नाही. अखेर ११ ऑगस्ट रोजी कुटुंबीयांनी कपुरथळा सिटी पोलीस ठाण्यात रवी बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली.

दरम्यान, पोलिसांना एका तरुणाचा जळालेला मृतदेह सापडला होता. पोलिसांनी त्या मृतदेहाचे फोटो रवीच्या कुटुंबीयांना दाखवले. काही दिवसांनी कुटुंबीय आणि काही परिचितांनी मृतदेहाची ओळख रवी कुमार म्हणून पटवल्याचे सांगितले. मुलाचा मृत्यू झाल्याचे समजून कुटुंबीयांनी १३ ऑगस्ट रोजी त्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. त्यानंतर धार्मिक विधीही पार पाडले.

रवी आता या जगात नाही, हे सत्य कुटुंबाने स्वीकारले. मात्र, २ सप्टेंबर रोजी कपुरथळा मध्यवर्ती कारागृहातून आलेल्या एका फोनने संपूर्ण प्रकरणाला अनपेक्षित वळण दिलं. जेलमधील कर्मचाऱ्याने रवी कुमार नावाची व्यक्ती कारागृहात असल्याची माहिती दिली. सुरुवातीला त्यांच्या या बातमीवर विश्वासच बसला नाही.

फोन आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी कुटुंबीय तुरुंगात पोचले. रवी कुमारला जिवंत पाहताच त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. ज्याचा मृत्यू झाल्याचं मानून अंत्यसंस्कार केले होते, तोच मुलगा समोर जिवंत असल्याने कुटुंबासाठी हा मोठा धक्का आणि तितकाच दिलासा देणारा क्षण ठरला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!