
जन्माष्टमीच्या रात्री संतापजनक प्रकार! मंदिरात जात असलेल्या अल्पवयीन मुलीचे अपहरण अन्…
मुझफ्फरनगरः कृष्णजन्माष्टमीच्या रात्री मंदिरात दर्शनासाठी निघालेल्या अल्पवयीन मुलीचे (वय १४) रस्त्यातून अपहरण करून, तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर जिल्ह्यात उघडकीस आला आहे. तीन तरुणांनी मुलीला जबरदस्तीने एका घरात नेले आणि त्यापैकी एकाने तिच्यावर बलात्कार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पीडितेच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
ही घटना छपार पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (ता. ४) जन्माष्टमीच्या रात्री पीडित मुलगी घराजवळील मंदिरात दर्शनासाठी जात होती. यावेळी समीर, वलीम आणि सलमान या तिघांनी तिचे रस्त्यातून अपहरण केले. यानंतर मुलीला समीरच्या घरात नेण्यात आले. तिथे समीरने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप पीडितेने केला आहे.
मुलगी बराच वेळ घरी न परतल्याने कुटुंबीय चिंतेत पडले. त्यांनी तिचा शोध सुरू केला. अखेर ती समीरच्या घरात भयभीत अवस्थेत आढळल्याचं वृत्त आहे. त्यानंतर मुलीने कुटुंबीयांना घडलेला प्रकार सांगितला. त्यांनी तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. त्यानुसार संबंधित आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणातील मुख्य आरोपी समीरला अटक करण्यात आली आहे, तर इतर दोन आरोपी फरार असल्याचं नमूद करण्यात आलं आहे.
या घटनेनंतर परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. योग साधना आश्रमाचे महंत स्वामी यशवीर महाराज यांनी आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यांनी आरोपींच्या घरांवर बुलडोझर कारवाई आणि कठोर दंडात्मक कारवाईची मागणी केली.
दरम्यान, उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री कपिल देव अग्रवाल यांनी पीडित कुटुंबाची भेट घेत आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिल्याचे वृत्त आहे.

