
दिल्लीत एकाचवेळी दोन इमारती कोसळल्या; त्यापैकी सहा मजली इमारतीच्या ढिगाऱ्यात अनेक विद्यार्थी अडकल्याची भीती…
नवी दिल्लीः राजधानी दिल्लीतील सत्य निकेतन परिसरात एकाचवेळी दोन इमारती कोसळल्या. त्यापैकी एका सहा मजली इमारतीमध्ये दिल्ली विद्यापीठाचे विद्यार्थी पेईंग गेस्ट म्हणून राहात होते. अपघात झाला, तेव्हा विद्यार्थी त्यांच्या खोल्यांमध्येच होते. त्यापैकी तिघांना वाचवण्यात आले आहे. मात्र, ढिगाऱ्याखाली किती विद्यार्थी अडकले आहेत, हे अद्याप समजू शकले नाही. सुरक्षेसाठी जवळच्या इमारतीही रिकाम्या करण्यात आल्या आहेत. ही घटना दुपारी दीड वाजता घडली. स्थानिक लोक ढिगारा हटवण्याचा प्रयत्न करत आहेत. काही वाहनेही ढिगाऱ्याखाली गाडली गेली असावीत, अशी भीती प्रत्यक्षदर्शींनी व्यक्त केली आहे.
एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले, की कोसळलेल्या इमारतीचे नाव ‘हॉस्टेल डेज’ आहे. तिच्या अगदी शेजारी असलेली दुसरी इमारतही कोसळली. ‘हॉस्टेल डेज’ ही फक्त मुलांसाठी असलेली सहा मजली इमारत होती. शेजारील इमारतही कोसळली. जे विद्यार्थी त्यांच्या खोल्यांमध्ये होते, ते सर्व ढिगाऱ्याखाली अडकले असावेत. अडकलेल्या विद्यार्थ्यांची नेमकी संख्या ढिगारे उपसल्यानंतरच समजू शकेल. अग्निशमन दल आणि बचाव पथके ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. अनेक विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत.
भारतीय जनता पक्षाचे आमदार अनिल शर्मा म्हणाले, की ही एक अत्यंत दुःखद घटना आहे. वेगवेगळ्या ठिकाणचे विद्यार्थी येथे शिकण्यासाठी येतात आणि या इमारतीत राहतात. आत किती विद्यार्थी होते हे सांगता येणार नाही. दुसरीकडे, इमारत कोसळल्यानंतर, स्थानिक लोक आपल्या परीने ढिगारा हटवत आहेत. अरुंद गल्लीमुळे बचावकार्यात अडथळा येत आहे, असे पोलिसांनी सांगितले.

