
नृत्याच्या वर्गासाठी जाणाऱ्या महिलेने स्वयंपाकास नकार दिल्याने मद्यधुंद पतीने केली निर्घृण हत्या…
नागपूर: गृहनिर्माण संस्थेतील नृत्य वर्गात जाण्यासाठी तयार झालेल्या महिलेला, तिच्या मद्यधुंद पतीने स्वयंपाक करण्यास सांगितले. तथापि, तिने नकार दिल्याने मतभेदाचे पर्यवसान हिंसेत झाले आणि संतापलेल्या पतीने तिला ठार मारले.
घरात स्वयंपाक करण्याऐवजी नृत्याच्या वर्गात जाण्याच्या महिलेच्या निर्णयावरून सुरू झालेल्या वादानंतर, पतीने तिला मारहाण केली. मारहाण करताना एक घाव वर्मी बसल्याने ही महिला मृत्यूमुखी पडली. पोलिसांनी पतीला अटक करून त्याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
पीडितेची ओळख यामिनी कृष्णलाल यादव, तर आरोपीचे नाव कृष्णलाल यादव (वय ४१) असल्याचे पोलिसांनी सांगितले. या दांपत्याला दोन लहान मुले आहेत.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, कृष्णलाल कामावरून घरी परतला आणि त्याने यामिनीला स्वतःसाठी व मुलांसाठी जेवण बनवायला सांगितले. मात्र, यामिनी त्यांच्याच सोसायटीमधील नृत्य वर्गाला जायची तयारी करत होती आणि तिने स्वयंपाक करण्यास नकार दिला.
जोडप्यामधील मतभेदाचे रूपांतर हिंसक भांडणात झाले. पोलिसांनी सांगितले की, त्यावेळी कृष्णलाल दारूच्या नशेत होता. त्याने आपल्या दोन मुलांसमोर यामिनीच्या मानेवर आणि पोटावर हल्ला केला.
हल्ल्यानंतर यामिनीला मान आणि पोटात तीव्र वेदना होऊ लागल्या आणि तिने आपल्या पतीला वेदनाशामक औषधे आणायला सांगितले. कृष्णलाल औषधांच्या दुकानात गेला, पण ते बंद असल्याने तो औषध न घेताच घरी परतला.
यामिनीची प्रकृती खालावत गेली आणि गंभीर अंतर्गत जखमांमुळे तिचे पोट फुगू लागले. नंतर तिला रुग्णालयात नेण्यात आले. तिथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. सुरवातीला पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. मात्र, शवविच्छेदन अहवालात मानेचे हाड मोडल्याचे आणि आतड्यांना गंभीर जखमी झाल्याचे उघड झाले.
पीडितेच्या भावाने सांगितले की, सुरुवातीला कुटुंबाला वाटले होते की यामिनीचा दुर्दैवी परिस्थितीत मृत्यू झाला आहे. परंतु गळा दाबल्याच्या आणि गंभीर अंतर्गत जखमांच्या खुणा दर्शवणाऱ्या शवविच्छेदन अहवालामुळे, तिच्या पतीला हत्येच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.
पत्रकारांशी बोलताना यामिनीचा भाऊ म्हणाला, की आम्ही मुंबईत असताना आम्हाला फोन आला आणि माझ्या बहिणीचे निधन झाल्याचे कळवण्यात आले. शवविच्छेदन अहवालात असे दिसून आले की, तिचा गळा दाबून खून करण्यात आला होता आणि तिच्या पोटावर जखमा होत्या. तिच्या पोटावर हल्ला झाल्याचे त्यात स्पष्ट झाले. या निष्कर्षांच्या आधारे, पोलिसांनी ‘एफआयआर’ दाखल करून कृष्णलाल यादव याला अटक केली. त्याच्यावर खुनाच्या कलम ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

