
३८ आठवड्यांची गरोदर; ऑपरेशनच्या वेळी मात्र पोटातले बाळ गायब? मग बाळ गेले तरी कुठे…
कराचीः एका ३८ आठवड्यांच्या गर्भवती महिलेला रुग्णालयात रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी डिलिव्हरीची तयारी सुरू केली, परंतु डिलिव्हरी करताना डॉक्टरांना समजले, की पोटात बाळच नाही! ही, महिला नऊ महिन्यांची गर्भवती होती, असा दावा तिच्या कुटुंबीयांनीही केला. पुराव्यादाखल त्यांनी वेळोवेळी रुग्णालयातून मिळालेले रिपोर्टही दाखवले. मग बाळ नेमके गेले कुठे? ही महिला खरेच गर्भवती होती का? जर नव्हती तर रिपोर्ट कसे मिळाले? हे गौडबंगाल चक्रावून सोडणारे होते.
ही घटना पाकिस्तानच्या कराचीतील आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही महिला २७ ऑगस्ट रोजी रुग्णालयात डिलिव्हरीसाठी गेली होती. तिने डॉक्टरांना अल्ट्रासाऊंड रिपोर्ट दाखवले. त्यात ती ३८ आठवड्यांची गर्भवती असल्याचे स्पष्टपणे नोंदविले होते. अल्ट्रासाऊंड रिपोर्ट दाखवून डॉक्टरांनी तिला डिलिव्हरीसाठी नेले. यावेळी डॉक्टरांनी तिची वैद्यकीय तपासणी केली आणि इतर काही टेस्ट देखील केल्या. त्यानंतर तिचे सिझेरियन ऑपरेशन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
ऑपरेशन टेबलवर घेतल्यानंतर डॉक्टरही चक्रावून गेले. तिच्या गर्भात बाळ नव्हतेच. कुटुंबाला हे आक्रित समजल्यानंतर त्यांनी डॉक्टरांशी वाद घातला. महिला गर्भवती होती, अल्ट्रासाऊंडमध्ये बाळ दिसत होते तर मग रुग्णालयात आल्यानंतर बाळ कसे गायब झाले? कुटुंबाने रुग्णालयातील डॉक्टरांवर बाळ हरवल्याचा आरोप केला. परिस्थिती चिघळत गेली. त्यामुळे पोलिसांना कळविण्यात आले. अखेर पोलिस तपासात संपूर्ण प्रकरण उघड झाले.
खरी ग्यानबाची मेख नंतर लक्षात आली. बाळ कधी हरवलेच नव्हते. या महिलेने गर्भवती असल्याचा केवळ देखावा केला होता. लग्न होऊन तीन वर्षे उलटून गेली होती. कुटुंबाकडून तिच्यावर अपत्यासंदर्भात दबाव होता. याच कारणास्तव तिने गर्भवती असल्याचे सांगून खोटे रिपोर्ट्स तयार केले.
दरम्यान, या प्रकरणानंतर रुग्णालयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. एखाद्या महिलेला जेव्हा सिझेरियनसाठी नेण्यात येते तेव्हा सर्वसाधारणपणे डॉक्टर सहसा पुन्हा अल्ट्रासाऊंड करतात. पण या प्रकरणात रुग्णालयातील डॉक्टरांच्या सांगण्यानुसार महिलेने दाखवलेल्या अल्ट्रासाऊंड रिपोर्टवर विश्वास ठेवून वैद्यकीय टेस्ट आणि सिझेरियन ऑपरेशनचा निर्णय घेण्यात आला होता.

