
तीन मुलांसह मातेची नळदुर्ग किल्ल्यावरून उडी; माय-लेकाचा मृत्यू, दोन मुलींची प्रकृती गंभीर…
धाराशिवः धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग येथील ऐतिहासिक किल्ल्यावरून एका मातेने आपल्या तीन निष्पाप चिमुकल्या मुलांसह थेट खाली उडी मारली. या दुर्देवी घटनेत आई आणि एका मुलाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर दोन लहान मुली गंभीर जखमी झाल्या आहेत. या भीषण घटनेमुळे जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.
घटनेची माहिती मिळताच नळदुर्ग पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने तातडीने मदतकार्य राबवून, जखमी चिमुकल्यांना बाहेर काढले. गंभीर जखमी झालेल्या दोन्ही मुलींवर प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील तातडीच्या उपचारासाठी धाराशिव येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, आत्महत्या करणारी महिला ही धाराशिव जिल्ह्याच्या उमरगा तालुक्यातील वंताळा गावची रहिवासी असल्याचे समोर आले आहे.
त्या माऊलीने पोटच्या तीन लहान लेकरांसह नळदुर्ग किल्ल्यावरून उडी मारून इतके टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. घरगुती वाद किंवा अन्य काही कारण आहे का, याचा तपास नळदुर्ग पोलिस करत आहेत.
माय-लेकाच्या अशा दुर्दैवी अंतामुळे वंताळा गावावर शोककळा पसरली असून दोन गंभीर जखमी चिमुकल्यांची प्रकृती सुधारावी, यासाठी गावात प्रार्थना करण्यात येत आहे.

