अकोल्यात विश्वासू हमालानेच मालकाला बांधून लुटले ५४ लाख…

अकोलाः सुमारे पाच वर्षांपूर्वी कामावर ठेवलेल्या एका हमालांनीच विश्वासघात करून दरोडा घातला. वरच्या मजल्यावर असलेल्या घरातून खाली दुकानात कामगारांना सूचना देण्यासाठी येण्याच्या तयारीत असतानाच, या हमालांनी घरात घुसून मालकाचे हात-पाय बांधले आणि सुमारे ५० लाख रुपये किंमतीचे दागिने आणि ४ लाख रुपये रोख रुपये लुटून पलायन केले. दरोड्याच्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

अकोल्यातील रामदास पेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मोहता मिल रोड, नया जीन परिसरात विजयकुमार गुप्ता हे वास्तव्यास आहेत. ते त्यांच्या घराच्या खालीच ‘गुप्ता फ्लॉवर ऑइल इंडस्ट्रीज’ नावाने व्यवसाय चालवतात. नेहमीप्रमाणे सोमवारी सकाळी सव्वासात वाजण्याच्या सुमारास गुप्ता हे आपल्या कामगारांना कामाच्या सूचना देण्यासाठी खाली येत होते. मात्र, त्याच वेळी दबा धरून बसलेल्या तिघांनी त्यांच्यावर अचानक प्राणघातक हल्ला चढवला.

विजयकुमार गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दरोड्याचा मुख्य सूत्रधार त्यांच्याकडे गेल्या चार ते पाच वर्षांपासून हमालीचे काम करणारा कामगारच आहे. मागील काही दिवसांपासून तो एका नवीन अज्ञात व्यक्तीला सोबत घेऊन येत होता. सोमवारी सकाळी त्याने आणखी एका साथीदाराला सोबत आणले आणि तिघांनी मिळून थेट घरात प्रवेश केला.

घरात शिरताच या तिघांनी गुप्ता यांना जबर मारहाण केली आणि त्यांचे हात-पाय घट्ट बांधून एका खोलीत डांबून ठेवले. मालकाला असहाय्य केल्यानंतर आरोपींनी घरातील तिजोरीवर डल्ला मारला. यामध्ये गुप्ता यांचे अडीच लाख रुपये आणि त्यांच्या पत्नीचे दीड लाख रुपये, असो एकूण ४ लाख रुपये रोख आणि ५० लाख रुपयांचे मौल्यवान सोन्याचे दागिने घेऊन आरोपी पसार झाले.

भरदिवसा घडलेल्या या मोठ्या दरोड्याची माहिती मिळताच रामदास पेठ पोलिस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी संपूर्ण घराची पाहणी केली असून आरोपींच्या शोधासाठी विविध पथके रवाना करण्यात आली आहेत.

घरातील तिजोरी कुठे आहे आणि ऐवज कुठे ठेवला आहे, याची खडान् खडा माहिती आरोपींना आधीपासूनच होती का? हा दरोडा पूर्ण नियोजित कटाचा भाग होता का? अशा सर्व मुद्द्यांवर आता पोलिस तपास करत आहेत. या घटनेमुळे अकोल्यातील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!