महापौरांचा पती असल्याचे भासवून शिक्षकाच्या फोटोचा गैरवापर; बदनामीकारक व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल…

मुंबई: मुंबईच्या महापौर रितू तावडे यांचा पती असल्याचा दावा करत, एका फोटोग्राफी शिक्षकाच्या छायाचित्राचा गैरवापर करून, युट्यूबवर टाकून बदनामी केल्याप्रकरणी काळाचौकी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात एफआयआर दाखल केला आहे. शिक्षक राजेश वासुदेव तावडे यांना २६ ऑगस्ट रोजी या व्हीडिओची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार केली. २३ ऑगस्टला प्रसारित करण्यात आलेल्या या व्हिडीओद्वारे आपली बदनामी करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप त्यांनी केला असून, व्हिडीओ तयार करणाऱ्या व्यक्तीचा शोध चालू आहे.

राजेश तावडे लालबाग येथे राहतात. ते फोटोग्राफीचे क्लास आणि स्टुडिओ चालवतात. तसेच फोटोग्राफीशी संबंधित फोटो आणि जाहिराती ते युट्यूब आणि फेसबुकवर पोस्ट करतात.

तावडे यांच्या इमारतीत राहणाऱ्या एका महिलेने २६ ऑगस्ट रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास त्यांना व्हॉट्सॲपवर युट्यूब शॉर्ट्सची लिंक पाठवली. लिंक उघडल्यानंतर त्यांना जीके शॉर्ट व्हीडिओज या चॅनेलवर त्यांच्याबाबतचा एक व्हीडिओ आढळला.

पोलिसांच्या माहितीनुसार, २३ ऑगस्ट रोजी प्रसारित करण्यात आलेल्या या व्हीडिओमध्ये राजेश तावडे यांचा फोटो आणि महापौर रितू तावडे यांचा फोटो एकत्र दाखवण्यात आला होता. त्यात राजेश तावडे हे महापौरांचे पती असल्याचा दावा करण्यात आला आहे. तावडे यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत, त्यांचा फोटो फेसबुक अकाउंटवरून घेतला असावा, तर महापौरांचा फोटो सोशल मीडियावरून घेतल्याचा संशय व्यक्त केला आहे.

तक्रारीनुसार, तावडे यांच्या नावासोबत त्यांचे शिक्षण, व्यवसाय, धर्म, छंद आणि कुटुंबाची माहितीही देण्यात आली आहे. कोणतीही पडताळणी न करता हा व्हीडिओ तयार करून प्रसारित करण्यात आल्याने आपली आणि महापौरांची बदनामी करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जीके शॉर्ट व्हीडिओज हे यूट्यूब चॅनेल १५ एप्रिल रोजी तयार करण्यात आले असून, चॅनेलचे सुमारे १,५३० सब्सक्राइबर्स असून, २४३ व्हीडिओ आहेत. या चॅनेलवर राजकीय नेते आणि चित्रपट क्षेत्रातील व्यक्तींच्या जीवनाविषयी माहिती देणयात येते.

या चॅनेलमागील व्यक्तीचा शोध घेण्यासाठी पोलिसांचा तपास चालू आहे. चॅनेल चालवणाऱ्या व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी इंटरनेट प्रोटोकॉल संबंधित माहिती मिळवण्याची प्रक्रिया सुरू असून, तावडे यांनी स्क्रीनशॉटही पोलिसांकडे सादर केले आहेत.

या प्रकरणी काळाचौकी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. संबंधित व्हीडिओ कोणी तयार केला, तो कोणत्या उद्देशाने प्रसारित करण्यात आला आणि त्यामागे नेमकी व्यक्ती कोण आहे, याचा तपास पोलिस करत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!