
सोशल मीडिया स्टारला झाडाला बांधून जिवंत जाळले, लिव्ह इन रिलेशनशिपचं कनेक्शन…
चंडीगडः ओळखीच्या व्यक्तींनीच अपहरण करून झाडाला बांधून सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असलेल्या एका मनजीत कौर नावाच्या महिलेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन फरारी संशयितांचा, हरियाणा पोलिस तपास करत आहेत. दरम्यान, गंभीररित्या भाजलेल्या मनजीत कौर या महिलेचा उपचार चालू असतानाच मृत्यू झाला आहे.
यासंदर्भात अधिक माहिती अशी, की मनजीत कौर हिचे आठ आठवड्यांपूर्वी दोन ओळखीच्या व्यक्तींनी अपहरण केले आणि डाला बांधून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेत मनजीत गंभीर भाजली होती. तिच्यावर चंडीगडमधील ‘पोस्टग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च’ (पीजीआयएमईआर) येथे उपचार सुरू होते. मृत्यूशी झुंज देत असताना २६ ऑगस्ट रोजी तिची प्राणज्योत मालवली. आता या हत्याकांडामागे लिव्ह-इन रिलेशनशिपचे कारण असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.
View this post on Instagram
मृत मनजीत कौर यांची आई कांता देवी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ३ जुलैच्या रात्री शुबी आणि पिंडा नावाच्या दोन संशयितांनी मंजीतला सेक्टर-३४ मधील एका दारूच्या दुकानाजवळ भेटण्यासाठी बोलावले होते. तेथे पोहोचताच दोघांनी तिला जबरदस्तीने गाडीमध्ये कोंबले आणि मोरिंडा (पंजाब) येथे घेऊन गेले.
मोरिंडा येथे नेल्यानंतर आरोपींनी आधी तिला बेदम मारहाण केली. त्यानंतर एका झाडाला बांधून पेटवून दिले. सुदैवाने, एका ओळखीच्या व्यक्तीने तिला आगीच्या विळख्यात पाहिले आणि तत्काळ घोंगड्याच्या मदतीने आग विझवून तिला मोरिंडाच्या स्थानिक रुग्णालयात दाखल केले. मात्र, प्रकृती चिंताजनक असल्याने तिला प्रथम मोहाली आणि त्यानंतर ९ जुलै रोजी चंडीगडच्या ‘पीजीआयएमईआर’ रुग्णालयात हलवण्यात आले.
पैशांच्या व्यवहारातून किंवा वैयक्तिक वादातून हा प्रकार घडल्याचा संशय आहे. रुग्णालयात कित्येक आठवडे ती बेशुद्धावस्थेत होती. ५ ऑगस्ट रोजी तिला काही काळासाठी शुद्ध आली, तेव्हा तिने तिच्यासोबत घडलेला हा अमानुष प्रकार कुटुंबीयांना सांगितला. परंतु, त्यानंतर तिची प्रकृती खालावत गेली. शरीराचा मोठा भाग गंभीररीत्या भाजल्यामुळे अखेर २६ ऑगस्ट रोजी तिने अखेरचा श्वास घेतला.
मनजीतच्या मृत्यूनंतर सेक्टर-३४ पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १४०(१) (अपहरण), १०३(१) (हत्या) आणि ३(५) (समान गुन्हेगारी उद्देश) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मनजीत घटस्फोटित असून, तिला सात वर्षे वयाचा मुलगा आहे. तिचे एका आरोपीसोबत लिव्ह-इन रिलेशनशिप असल्याचेही पोलिस तपासात समोर आले आहे.
सध्या सेक्टर-३४ पोलिस ठाण्याचे पथक शुबी आणि पिंडा या दोन्ही मुख्य आरोपींच्या शोधात विविध ठिकाणी छापे टाकत आहे. चंडीगड ते मोरिंडा या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेजची कसून तपासणी केली जात असून, हत्येमागील मुख्य कारण शोधण्यासाठी मनजीतच्या नातेवाईकांकडे आणि मित्रांकडे चौकशी केली जात आहे.
Video: मस्साजोगची पुनरावृत्ती! युवकाचे अपहण करून भरदिवसा डोंगरात नेऊन जाळले…
धक्कादायक! विद्यार्थिनीने शाळेतच दिला बाळाला जन्म अन् जाळले…
महाराष्ट्र हादरला! जादूटोणाच्या संशयातून दोन जणांना जाळले जीवंत…
धक्कादायक! प्रियकराने रात्रीच्या वेळी अल्पवयीन प्रेयसीला भेटायला बोलावले अन्…

