
विवाहाच्या वादातून चांदगुडे कुटुंबाचा दुर्दैवी अंत? बहिणीचा गंभीर आरोप, आई-वडिलही मनातलं सगळं बोलले!
छत्रपती संभाजीनगरः येथील खवड्या डोंगरावरून उडी मारून चांदगुडे कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याच्या घटनेमागे आता कौटुंबिक वादाची शक्यता व्यक्त केली जात आहे. मुरलीधर चांदगुडे यांच्या प्रेमविवाहाला त्यांच्या आई-वडिलांचा विरोध होता आणि याच कारणामुळे कुटुंबात दुरावा निर्माण झाल्याची माहिती समोर आली आहे.
मुरलीधर आणि त्यांची पत्नी संगीता यांचं याच कलहातून गावाकडे येणं-जाणं कमी झालं होतं. दरम्यान बहीण आणि आई वडिलांसोबत बोलत असल्यामुळे संगीता यांनी मुरलीधर यांना घरातून बाहेर काढल्याचा आरोप त्यांची बहीण शोभा म्हस्के यांनी केला आहे. दुसरीकडे, मुलाचं गावाकडे येणं कमी झाल्याने मुरलीधर आणि त्यांच्या वडिलांमध्ये संवादही कमी झाला असल्याची माहिती त्यांच्या आई-वडिलांनी दिली आहे. दरम्यान, मयत मुरलीधर चांदगुडे यांचे वडील रामभाऊ चांदगुडे यांनी आपल्या मुलाला (मुरलीधरला) पत्नी आणि त्यांच्या मुलाने घराबाहेर काढल्याचा आरोप देखील केला. मुरलीधर चांदगुडे हे मूळचे जालना जिल्ह्यातील धनगर पिंपळगाव येथील रहिवाशी होते. ते २० वर्षापूर्वीच कामानिमित्त छत्रपती संभाजीनगरमध्ये राहण्यासाठी गेले होते. त्यामुळे प्रेमविवाहाला विरोध, कुटुंबातील दुरावा आणि त्यातून निर्माण झालेला गृहकलह…या पार्श्वभूमीवरच चांदगुडे कुटुंबाने हे टोकाचं पाऊल उचललं का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पोलीस, स्थानिक आणि आई कुणालला आत्महत्या न करण्यासाठी विनवणी करत होते. कुणालने खाली उतरावे म्हणून आईने जिवाच्या आकांताने त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. तुझा पप्पांसोबत वाद आहेत ना, हे बघ मी आताच मंगळसूत्र काढून फेकते, तुझ्या वडिलांना सोडून देते, तुझ्यासोबत येते, आपण दोघं राहू, पण मला सोडून जाऊ नकोस, अशी आर्त विनवणी आई करत होती. दोघे हताश होऊन संवाद साधत होते. आईच्या आर्त हाकेनंतरही कुणाल, आई, माझे कोणीच ऐकत नाही, मला जगण्यात रस नाही, माझ्या लाइफचे सोल्युशनच नाही, काहीच होणार नाही गं, असं कुणाल म्हणाला आणि पुढे सगळं होत्याचं नव्हतं झालं.
तिसगाव परिसरात असणाऱ्या खवड्या डोंगरावरुन खाली पडून तीन जणांचा मृत्यू झाला. डोंगरावरुन उडी मारुन आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात असलेल्या मुलाला वाचवताना त्याच्या आई-वडिलांचाही दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना २१ ऑगस्ट घडली. कुणाल मुरलीधर चांदवडे, मुरलीधर चांदवडे आणि संगीता चांदवडे अशी मृतांची नावे आहेत. कुणालचा वडिलांसोबत वाद झाला होता. त्यानंतर कुणाल काल सकाळी सुमारे १० वाजता खवड्या डोंगरावर गेला. त्याचा हेतू टोकाचं पाऊल उचलण्याचा असल्याचं समोर आल्यानंतर आई-वडील त्याला समजावण्यासाठी डोंगरावर पोहोचले. कुणालला समजावण्याचे प्रयत्न सुमारे तीन तास सुरू होते. पोलिस, स्थानिक नागरिक आणि अग्निशमन दलाच्या जवानांनीही त्याला खाली आणण्याचा प्रयत्न केला. त्याला वाचवण्यासाठी खाली जाळी लावण्याचाही प्रयत्न करण्यात आला. मात्र कुणाल वारंवार आपली जागा बदलत होता. अखेर कुणालने डोंगरावरून उडी घेतली. मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात वडील मुरलीधर यांचाही तोल गेला आणि ते खाली कोसळले. त्यानंतर मुलगा आणि पती खाली पडल्याचे पाहून आई संगीता यांचाही दुर्दैवी अंत झाला. तिघांचाही डोंगराच्या खाली पडून मृत्यू झाला.

