
उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; मुंबई व बंगळुरू येथून आरोपी ताब्यात…
पुणे (सुनिल सांबारे): दुकानाचे शटर उचकटून घरफोडी करत सोन्याचे दागिने चोरून नेल्यानंतर तब्बल चार महिने पोलिसांना गुंगारा देणाऱ्या टोळीचा उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी मुंबई आणि बंगळुरू येथून दोन आरोपींना ताब्यात घेतले असून, त्यांच्या चौकशीतून बिहारमधील सीतामढी येथे लपवून ठेवलेले सुमारे १२ लाख ६० हजार रुपये किमतीचे १४ तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
मौजे महाळुंगे इंगळे, ता. खेड, जि. पुणे येथे भाजीविक्रीचा व्यवसाय करणाऱ्या कविता मदन कड या दुकानाच्या गाळ्यातच राहत होत्या. त्या यात्रेसाठी आपल्या मूळ गावी गेल्या असताना ६ फेब्रुवारी २०२६ रोजी पहाटे दोनच्या सुमारास अज्ञात चोरट्याने दुकानाचे शटर उचकटले. दुकानातील साहित्य अस्ताव्यस्त करून कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने चोरून नेण्यात आले. याप्रकरणी उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १०७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३३१ (३), ३०५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. मध्यमवर्गीय कुटुंबाच्या घरातून मोठ्या प्रमाणात सोन्याचे दागिने चोरीला गेल्याने पोलिसांनी हा गुन्हा गांभीर्याने घेतला. परिमंडळ ४ च्या पोलिस उपायुक्त श्वेता खेडकर यांनी घटनास्थळी भेट देऊन गुन्हा उघडकीस आणण्यासाठी तपास पथकाला मार्गदर्शन केले.
View this post on Instagram
वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक कल्याण घाडगे यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकाने तपास सुरू केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. मात्र, आरोपींबाबत ठोस माहिती मिळत नव्हती. तपासादरम्यान पोलिस अंमलदार संतोष काळे आणि शुभम खंडागळे यांना गोपनीय बातमीदारामार्फत दोन संशयितांची माहिती मिळाली.
त्यानुसार पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्यांनी घरफोडीच्या गुन्ह्याची कबुली दिली. या गुन्ह्यातील त्यांचा तिसरा साथीदार निक्कुकुमार सिंग चोरीचे सर्व सोने घेऊन बिहारमधील आपल्या मूळ गावी पळून गेल्याची माहिती त्यांनी दिली.
मुख्य आरोपी पोलिसांना चकवा देण्यासाठी प्रथम बिहार आणि त्यानंतर कर्नाटकात लपून राहत होता. चोरीचे दागिने लपविण्यासाठी त्याने आपला भाऊ रंजन सिंग याचीही मदत घेतल्याचे तपासात निष्पन्न झाले. मात्र, दोन्ही भावांचा ठावठिकाणा पोलिसांना लागत नव्हता. गुन्हे शोध पथकाने गुन्हा घडल्यापासून तब्बल चार महिने सातत्याने तपास सुरू ठेवला. तांत्रिक विश्लेषण आणि विविध अंगाने केलेल्या तपासातून पोलिसांनी रंजन सिंग याला मुंबई येथून, तर निक्कुकुमार सिंग याला बंगळुरू येथून ताब्यात घेतले.
पोलिस कोठडीतील चौकशीत आरोपींनी चोरीचे सोन्याचे दागिने बिहारमधील सीतामढी येथे लपवून ठेवल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिस पथक आरोपींसह बिहार येथे गेले. तेथे केलेल्या कारवाईत एकूण १२ लाख ६० हजार रुपये किमतीचे १४ तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले.
अटक करण्यात आलेले आरोपी
निक्कुकुमार देवकी सिंग (वय २२), रा. ब्लॉक भाऊर, थाना, जि. सीतामढी, बिहार.
रंजनकुमार देवकी सिंग (वय २०), रा. ब्लॉक भाऊर, थाना, जि. सीतामढी, बिहार.
राजकुमार ऊर्फ प्रिन्सकुमार विजय पासवान (वय १९), रा. डेहरी ओनसना बाग, विजय पासवान बाग, रोहतास, बिहार.
डिंपल पटेल विनोद सिंग (वय २६), रा. नसेज, थाना कुदरा, जि. कैमूर भभुआ, बिहार.
संबंधित कारवाई पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे, सहपोलिस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलिस आयुक्त सारंग आव्हाड, अपर पोलिस आयुक्त प्रादेशिक विभाग बसवराज तेली, पोलिस उपायुक्त परिमंडळ ४ श्वेता खेडकर आणि सहायक पोलिस आयुक्त महाळुंगे विभाग प्रिया डमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. उत्तर महाळुंगे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी, सहायक पोलिस निरीक्षक कल्याण घाडगे, पोलिस अंमलदार राजू कोणकेरी, अमोल बोराटे, विठ्ठल वडेकर, संतोष काळे, गणेश गायकवाड, संतोष वायकर, मंगेश कदम, हरी रणदिवे, मंगेश घोलप, साहिल सांडभोर, समीर महात तसेच परिमंडळ ४ पोलिस उपायुक्त कार्यालयातील सहायक फौजदार तुकाराम घुगे यांच्या पथकाने ही कामगिरी केली. या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक कल्याण घाडगे करीत आहेत.
मुंबईत पोलिसाने युवतीला आक्षेपार्ह पद्धतीने पकडलं; पोलिसांनी वस्तुस्थिती आणली समोर…
पोलिसकाका वाटतात तितके वाईट नव्हते निलंबित करू नका; युवकाने सांगितली इनसाईड स्टोरी…
दिल्लीत महिलेवर हात उचलणाऱ्या DCP संदीप लांबा यांच्यावर सरकारकडून कारवाई…
पुणे पोलिसांनी स्कॉर्पिओवरून बसवून काढली आरोपींची धिंड…

