
पुणे-मुंबई महामार्गावरील पहाटेचा सुमारास थरार; पोलिसांवरच गोळीबार…
पुणे : पिंपरी-चिंचवड शहरात घरफोडी करणाऱ्या सराईत चोरट्यांना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर आरोपींनी गोळीबार करण्याचा प्रयत्न केल्याची थरारक घटना घडली आहे. पुणे-मुंबई महामार्गावरील सोमाटणे फाटा टोलनाक्याजवळ गुरुवारी (ता. २७) पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास हा थरार घडला असून, पोलिसांनी तिघा सराईत चोरट्यांना अटक केली आहे.
पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या आदेशानुसार, गुन्हे शाखा युनिट दोन रावेत पोलिस ठाण्याच्या हद्दीतील घरफोडीच्या गुन्ह्याचा समांतर तपास करत होते. पोलिस हवालदार विक्रम कुदळ यांना माहिती मिळाली की, संशयित चोरटे चोरीच्या कारमधून सोमाटणे फाटा टोल नाक्यावर येणार आहेत. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद पवार यांनी तातडीने सापळा रचून संशयित कार थांबवली. पोलिसांनी चोरट्यांना बाहेर येण्यास सांगितले असता, कारमध्ये मागे बसलेला आरोपी मनीष बाबूलाल कुशवाह (मूळ रा. मध्य प्रदेश) याने पोलिसांवर गोळीबार करण्याच्या उद्देशाने पिस्तूल काढले.

पोलिस हवालदार भाऊसाहेब राठोड यांनी प्रसंगावधान दाखवत आरोपीच्या दिशेने झेप घेतली. या झटापटीदरम्यान झालेल्या गोळीबारात गोळी कारच्या छतामधून (टपामधून) आरपार गेली. ज्यामुळे मोठा अनर्थ टळला. हवालदार राठोड यांनी तत्काळ कुशवाह याच्या हातातील पिस्तूल हिसकावून घेतले आणि कारमधील अन्य दोन सराईत आरोपी सनीसिंग पापासिंग दुधानी आणि जलसिंग राजपूतसिंग दुधानी (दोघेही रा. हडपसर, पुणे) यांना जेरबंद केले. तिन्ही आरोपींवर तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही यशस्वी कारवाई केली. पोलिस पुढील तपास करत आहेत.
पुणे जिल्ह्यातील पेट्रोल पंपावर गोळीबार करत टाकला दरोडा…
पुणे! घायवळ टोळीकडून शुल्लक कारणावरून भररस्त्यात एकावर गोळीबार…
पुणे शहरातील मध्यवर्ती भागात पहाटेच्या सुमारास गोळीबार…
Video: पुणे पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या आरोपींची काढली वरात…
पुणे शहरात चोरट्यांनी केला पोलिस अधिकाऱ्याला जीवे मारण्याचा प्रयत्न; स्वसंरक्षणार्थ गोळीबार…

