
घाटंजी न्यायालयाने तक्रारदाराचा फेटाळला अर्ज…
घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : घाटंजी तालुक्यातील कुर्ली येथील जितेंद्र बळीराम तम्मेवार यांनी मोठे बंधू रविंद्र बळीराम तम्मेवार व इतराविरुद्ध भादंवि कलम 420, 451 व नोंदणी अधिनियम 1908 चे कलम 82 अंतर्गत गुन्हे नोंद करण्यासाठी घाटंजी न्यायालयात Cr.P.C. 156 (3) अर्ज दाखल केला होता. मात्र, सदरचा अर्ज घाटंजी येथील कोर्ट क्रमांक 2 दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) तथा प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी ए. ए. उत्पात यांनी फेटाळला असून नामंजूर केला आहे. तक्रारदार जितेंद्र तम्मेवार यांचेतर्फे ॲड. नेताजी राऊत (ॲड. एन. एम. राऊत) यांनी युक्तिवाद केला.
दरम्यान, सदर आदेशाविरुद्ध विचलित होऊन तक्रारदार जितेंद्र तम्मेवार यांनी जिल्हा न्यायाधीश 1 तथा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. ए. लऊळकर यांच्या न्यायालयात Cri.Rev.Appln/14/2024 दाखल केल्याचे समजते.
घाटंजी तालुक्यातील कुर्ली येथील अर्जदार जितेंद्र तम्मेवार व रविंद्र तम्मेवार हे दोघेही सख्खे भाऊ आहे. तसेच विवादित घरजागा विकत घेणारी गैरअर्जदार क्रमांक दोन ही व्यक्ती आहे. नझुल शिट क्रमांक 2 भुमापन क्रमांक 218 आहे. गैरअर्जदार रविंद्र बळीराम तम्मेवार हा 40 वर्षांपासून गडचिरोली येथे राहत आहे. वाद घरजागा अनेक वर्षांपासून अर्जदार जितेंद्र बळीराम तम्मेवार यांच्या ताब्यात आहे, असे अर्जदाराचे म्हणने आहे. वाद घरजागेचा हुकूमनामा मिळावा यासाठी घाटंजी येथील दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) न्यायालयात नियमित दावा क्रमांक 49/2018 अर्जदाराने दाखल केला आहे. मात्र, गैरअर्जदार रविंद्र तम्मेवार याने बेकायदेशीर वाद घराची खुली जागा गैरअर्जदार क्रमांक 2 हिला विक्री करुन दिली आहे. त्यामुळे अर्जदाराचे ₹ 60,000 चे नुकसान झाले आहे. गैरअर्जदारांनी विवादीत घराची खरेदी केल्याने शासनाचा मुद्रांक शुल्क बुडविला आहे व शासनाची फसवणूक केली आहे. घाटंजी न्यायालयात नियमित दावा क्रमांक 49/2018 सुरू व प्रलंबित असतांना देखील सदर जागेचा वाद कोणत्याही न्यायालयात सुरू नाही, असे खोटे पणाने नमुद केले आहे.
या संदर्भात पोलिस ठाणे पारवा, जिल्हाधिकारी यवतमाळ, जिल्हा पोलिस अधीक्षक यवतमाळ, नोंदणी अधिकारी घाटंजी व जिल्हा नोंदणी अधिकारी यवतमाळ आदींना कळविण्यात आले होते. मात्र, या वर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. सदर प्रकरणातील नोंदणी खरेदी खत क्रमांक 1114/2022 असा आहे. तक्रारदार जितेंद्र तम्मेवार यांचेतर्फे ॲड. अजय डाखोरे जिल्हा व सत्र न्यायालयात काम पाहत आहे.

