
कॅलिफोर्नियाच्या महामार्गावर विमान कोसळले, डॅशकॅम व्हीडिओमध्ये चित्रबद्ध; ३ प्रवासी थोडक्यात बचावले…
वॉशिंग्टन: कॅलिफोर्नियातील सॅन होजे येथे अत्यंत कमी उंचीवरून उडणारे एक छोटे विमान थेट रस्त्यावर कोसळल्याने, द्रुतगती मार्गावर घबराट पसरली. सुदैवाने वैमानिकासह अन्य दोन प्रवासी सुखरूप बचावले आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.
वाहतूक सिग्नलवर उभ्या असलेल्या एका गाडीच्या डॅशकॅममध्ये चित्रित झालेल्या या भीषण अपघातात, विमानाचा पंख रस्त्यावरील दिव्याच्या खांबाला धडकला आणि विमान रस्त्यावर पालथे पडले. सुदैवाने, दोन प्रौढ आणि एका मुलासह विमानातील सर्व प्रवासी या अपघातातून बचावले.
सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हीडिओ फुटेजनुसार, ही घटना शनिवारी सॅन होजेमधील कॅपिटल एक्सप्रेसवे आणि एक्सकॅलिबर ड्राइव्हला छेदणाऱ्या रस्त्याजवळ घडली. एक छोटे एक इंजीन असलेले प्रोपेलर विमान अनपेक्षितपणे कमी उंचीवर आणि तीव्र कोनात उडताना दिसले.
रस्ता ओलांडताना विमानाचा एक पंख रस्त्यावरील दिव्याच्या खांबाला जोरदार धडकला. ही धडक इतकी तीव्र होती की पंख तत्काळ तुटून पडला, त्यामुळे विमान नियंत्रणाबाहेर जाऊन गरगर फिरू लागले. त्यानंतर विमान पुढे झेपावले आणि पक्क्या रस्त्यावर नाकाच्या बाजूने आदळले. घटनास्थळावरील छायाचित्रांमध्ये विमानाचा पुढचा भाग पूर्णपणे चुरगळलेला आणि वाकलेला दिसत आहे.
सॅन होजे अग्निशमन विभागाच्या माहितीनुसार, वाहनात दोन प्रौढ आणि एक मूल होते. अपघाताची तीव्रता लक्षात घेता, खबरदारीचा उपाय म्हणून तिघांनाही स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले. त्यांना तपासल्यानंतर डॉक्टरांनी त्यांच्यापैकी कोणालाही जीवघेणी दुखापत झालेली नाही, असे सांगितले.
अधिकाऱ्यांनी सांगितले, की रस्त्यावर वर्दळ असूनही या अपघातात इतर कोणतीही वाहने नव्हती, त्यामुळे एक मोठी दुर्घटना टळली. धडकेनंतर रस्त्यावर थोडे इंधन सांडले होते, ते सुरक्षा कर्मचाऱ्यांनी वेळीच स्वच्छ केले.
सॅन होजेमधील दोन दिवसांतील हा दुसरा विमान अपघात होता. केवळ एक दिवस आधी, शुक्रवारी, रीड-हिलव्ह्यू विमानतळावर उतरताना आणखी एका लहान विमानाचा अपघात झाला होता. सॅन होजे अग्निशमन विभागाने ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर, लँडिंग गिअरमधील तांत्रिक बिघाडामुळे विमानाला आपत्कालीन लँडिंग करावे लागल्याचे म्हटले आहे.

