
हप्त्यावर मोबाईल खरेदीसाठी जामीन राहिलेल्या मित्रावरच चाकूने हल्ला करून हत्या…
नवी मुंबई: हप्त्यावर घेतलेल्या दोन मोबाईलच्या खरेदीनंतर, हप्ते थकल्यानंतर त्याचा जाब विचारणाऱ्या जामीनदार मित्रावरच चाकूहल्ला करून त्याची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार, नवी मुंबईत घडल्याचे पोलिसांनी सांगितले.
मोबाईल खरेदीनंतर थकलेल्या हप्त्यांमुळे जामीनदार मित्राच्या मागे, दुकानदाराच्या हप्तेवसुली करणाऱ्या एजंटाने वसुलीसाठी तगादा लावला. त्यामुळे जामीनदार मित्राने आपल्या मित्राला त्याचा जाब विचारला. यावेळी दोघांमध्ये वाद झाला आणि त्याचे पर्यवसान चाकूहल्ल्यात झाले. मित्राचा मृतदेह झुडुपात लपवून त्याने पळ काढल्याची माहिती, नवी मुंबई पोलिसांनी दिली.
मृत तरुणाचे नाव प्रतीक दिलीप आंबवले (वय २३) असून, तो ठाण्यातील कोपरी परिसरात राहातो. त्याने कर्जावर दोन मोबाईल फोन खरेदी केले होते. या कर्जासाठी पनवेलमध्ये राहणारा त्याचा मित्र प्रतीक मोहन जाधव (वय ३०) जामीनदार होता. मात्र, आंबवलेने मोबाईलचे हप्ते भरले नाहीत. त्यामुळे कर्जवसुली करणाऱ्या एजंटकडून जाधवकडे वारंवार पैशांची मागणी होऊ लागली. याच कारणावरून दोघांमध्ये वाद झाला होता.
पोलिसांच्या चौकशीत समोर आलेल्या माहितीनुसार, ८ नोव्हेंबर रोजी पहाटे सुमारे १ वाजता दोघांची पनवेल रेल्वे स्थानकावर भेट झाली. त्यानंतर ते शिवकर गावाच्या दिशेने गेले. यावेळी जाधवने थकलेल्या हप्त्यांचा विषय काढला. मोबाईलचे कर्ज न फेडल्यामुळे एजंट आपल्याला त्रास देत असल्याबद्दल त्याने आंबवलेला जाब विचारला. त्यावरून दोघांमध्ये जोरदार वाद झाला. वादादरम्यान आंबवलेने जाधवला लाथ मारल्याचे आरोपीने पोलिसांना सांगितले. त्यामुळे संतापलेल्या जाधवने चाकू काढून आंबवलेवर वार केले. या हल्ल्यात आंबवलेचा मृत्यू झाला.
हत्येनंतर आरोपीने आंबवलेचा मृतदेह जवळच्या झुडपात लपवला. त्यानंतर रक्ताने माखलेला चाकू मृताच्या काळ्या बॅगेत ठेवून ती शिवकर-ओएनजीसी मार्गावरील पुलाखाली फेकली आणि घटनास्थळावरून पळ काढला, अशी माहिती पोलिसांनी दिली.
दरम्यान, ९ नोव्हेंबरपासून आंबवले बेपत्ता असल्याने कोपरी पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान त्याच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन पनवेल तालुक्यातील उसार्ली गावाजवळ असल्याचे निष्पन्न झाले. मोबाईल कॉल रेकॉर्ड तपासले असता, जाधवने आंबवलेला तब्बल २२ वेळा फोन केल्याचे समोर आले. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सोमवारी (ता. १६) जाधवला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने गुन्हा कबूल केल्याचे पोलिसांनी सांगितले.
त्यानंतर पोलिसांनी शिवकर गावातील एका शाळेमागे, नाल्याजवळील झुडपातून कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह ताब्यात घेतला. नातेवाईकांनी मृतदेहाची ओळख पटवली. त्यानंतर तो शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आला. नवी मुंबईचे सहाय्यक पोलिस आयुक्त मयूर भुजबळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, पनवेल शहर पोलिसांनी आरोपीविरोधात हत्या आणि पुरावा नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

