रिलायन्सच्या चाकण गोदामात उंदीर व झुरळे; चांगली आणि मुदतबाह्य व खराब उत्पादनांची साठवणूक एकत्र…

पुणेः महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) रविवारी सलग दुसऱ्या दिवशी रिलायन्स रिटेलवर कारवाई केली असून, पुणे जिल्ह्यातील चाकण येथील त्यांच्या गोदामाचा आणि निगोजे येथील ब्लिंकइटशी संबंधित एका युनिटचा परवाना निलंबित केला आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

‘एफडीए’ने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की तपासणीदरम्यान उंदीर आणि झुरळांचा प्रादुर्भाव, अयोग्य साठवणूक आणि मुदत संपलेल्या अन्न उत्पादनांच्या विल्हेवाटीची नोंद न ठेवणे, पीठ आणि रवा जमिनीवर इतस्ततः पडलेला यासह अन्न सुरक्षेचे अनेक नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळून आले.

‘एफडीए’ने १४ ऑक्टोबर रोजी पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात, चाकण येथील रिलायन्स रिटेल लिमिटेडच्या गोदामाची पाहणी केली. या पाहणीत असे आढळून आले, की मुदत संपलेल्या आणि खराब झालेल्या खाद्यपदार्थांची विल्हेवाट लावण्याबाबत किंवा ते नष्ट करण्याबाबत समाधानकारक नोंदी ठेवण्यात ही संस्था अपयशी ठरली आहे. संपूर्ण गोदामात उंदीर आढळून आले, तसेच मुदत संपलेले आणि खराब झालेले पदार्थ वेगळे ठेवण्याऐवजी चांगल्या पदार्थांबरोबर एकत्र ठेवण्यात आले होते. फरशीच्या फटींमध्ये झुरळे आढळून आली आणि कर्मचारी आवारात थुंकताना दिसले.

पुणे सर्कल-५ च्या अधिकाऱ्याने १५ ऑक्टोबर रोजी गोदामाचा परवाना निलंबित केला आणि उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) दाखल करण्यात केला आहे. याशिवाय, ‘एफडीए’ने १४ ऑक्टोबर रोजी खेड तालुक्यातील निगोजे येथील ब्लिंकइटची संलग्न कंपनी मे. लिंकइट कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या गोदामाचीही तपासणी केली.

‘एफडीए’ने सांगितले की, तपासणीदरम्यान कोल्ड-रूमचे तापमान पाच अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असल्याचे आढळून आले आणि कोल्ड चेन देखभालीशी संबंधित कागदपत्रे उपलब्ध नव्हती. कच्चे आणि शिजवलेले खाद्यपदार्थ एकत्र ठेवलेले आढळले, तर ५० किलो टाटा मीठ आणि ६० किलो रवा थेट जमिनीवर ठेवलेला आढळला. अनेक पाकिटांमधून गळती होत होती आणि झुरळांचा प्रादुर्भावही आढळून आला, असे या निवेदनात म्हटले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!