
रॅपिडो कंपनीविरोधात पुण्यात गुन्हा दाखल, प्रशासनाकडून कंपन्यांना दुचाकी टॅक्सी सेवा त्वरित थांबवण्याचे निर्देश…
पुणे: ‘रॅपिडो’ सारख्या काही कंपन्यांनी, कोणत्याही प्रकारचा अधिकृत परवाना नसताना पुणे शहरात दुचाकी प्रवासी सेवा सुरू केली आहे. ही सेवा त्वरित बंद करावी, असे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी यापूर्वीच दिले होते. तथापि, रॅपिडो सेवा चालविणाऱ्या रोपन ट्रान्सपोर्ट प्रा. लि. कंपनीविरोधात विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या पथकाने स्वतः रॅपिडो अॅपवरून बाइक राइड बुक करून केलेल्या तपासणीच्या आधारे ही तक्रार देण्यात आली. त्यानंतर संबंधित दुचाकी ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली आहे.
पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक प्रसाद गोवर्धन सुरवसे यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. कंपनीकडून विनापरवाना प्रवासी वाहतूक करून, शासनाची आणि प्रवाशांची फसवणूक होत असल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. पुणे शहरात रॅपिडो अॅपच्या माध्यमातून चालू असलेल्या बेकायदा प्रवासी वाहतुकीवर कारवाई करण्याचे आदेश, परिवहन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले होते. त्यानुसार मोटार वाहन निरीक्षक गस्त घालत होते आणि सुरवसे यांनी स्वतःच्या मोबाइलमधील रॅपिडो अॅपवरून कॉमर्सझोन, येरवडा ते कोथरूड बस डेपो अशी बाइक राइड बुक केली. या प्रवासासाठी अॅपवर १३ किलोमीटर अंतर आणि १७९ रुपये भाडे दाखविण्यात आले होते. या दुचाकीवर मोटार वाहन कायद्यानुसार चलन देण्यात आले. त्यानंतर ती ताब्यात घेऊन विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली आहे.

