गुजरातमध्ये केमिकल कंपनीत भीषण स्फोट; ५ कामगारांचा मृत्यू, विषारी वायूची गळती…

भरूच: गुजरातमधील भरूच जिल्ह्यातील रासायनिक उत्पादन करणाऱ्या कंपनीत भीषण स्फोट होऊन ५ कामगारांचा मृत्यू झाला, तर अन्य ५ जण जखमी झाले आहेत. वागरा तालुक्यातील सायखा जीआयडीसी परिसरातील सिनझील फार्माकेम या कंपनीत शुक्रवारी (ता. १६) रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. हायड्रोजनेशन प्रक्रियेदरम्यान झालेल्या स्फोटानंतर विषारी मिथिलीन डायक्लोराइड (एमडीसी) वायूची गळती झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी आज (ता. १७) येथे दिली.

भरूचच्या उपजिल्हाधिकारी मनीषा मनानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सिनझील फार्माकेम कंपनीने सायखा येथे सुमारे वर्षभरापूर्वीच उत्पादन सुरू केले होते. या कंपनीत औषधनिर्मितीसाठी आवश्यक असलेल्या इंटरमिजिएट रसायनांचे उत्पादन केले जाते.

हा स्फोट इतका भीषण होता की, त्यात रिॲक्टर टँक फुटला आणि यंत्रसामग्रीचे भाग परिसरात विखुरले, असे उपजिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. स्फोटानंतर मिथिलीन डायक्लोराइड या विषारी रसायनाच्या वायूची गळती झाल्यानं परिस्थिती अधिकच गंभीर बनली.

या दुर्घटनेत ५ कामगारांचा मृत्यू झाला असून, ५ जण जखमी झाले आहेत. घटनेबाबत अधिक तपशील आणि स्फोटाचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही.

भरूचचे पोलीस अधीक्षक (एसपी) अक्षयराज मकवाना यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांची ओळख आमोद येथील जयदीप महेशभाई पटेल आणि भाविक दिलीपकुमार वसावा, गीर सोमनाथ जिल्ह्यातील वृंद तलाविया, तसेच उत्तर प्रदेशातील अनिकेत हरिलाल गौतम आणि अर्जुन कुमार राम सिंह गौतम अशी पटली आहे.

या दुर्घटनेत पवन कुमार राम सिंह गौतम, मौसम कुमार रामसेवक यादव, शिवदयाल राम अवतार यादव, प्रतीक प्रवीण प्रजापती आणि प्रियांशु बहादुरलाल हे 5 कामगार जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून, ते बिहार आणि उत्तर प्रदेशातील रहिवासी आहेत.

औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य संचालनालयाच्या (DISH) एका अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, हायड्रोजनेशन प्रक्रियेदरम्यान झालेल्या स्फोटानंतर मिथिलीन डायक्लोराइड (MDC) वायूची गळती सुरू झाली. घटनेची माहिती मिळताच गुजरात प्रदूषण नियंत्रण मंडळ, DISH आणि पोलीस विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. स्फोटाचं नेमकं कारण शोधण्यासाठी संबंधित यंत्रणांकडून तपास सुरू आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!