
दिल्ली मेट्रोमध्ये जागेवरून झालेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू; माजी आयएएस अधिकाऱ्यासह मुलाला अटक…
नवी दिल्ली: दिल्ली मेट्रो ट्रेनमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी राखीव असलेल्या जागेवरून झालेल्या वादात एका ४८ वर्षीय व्यक्तीला थप्पड मारून जोरात ढकलून दिल्याने त्याचा मृत्यू झाल्याची माहिती, पोलिसांनी येथे दिली. या प्रकरणी एक माजी आयएएस अधिकारी आणि त्याच्या मुलाला अटक करण्यात आली आहे.
ही घटना ८ ऑक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालय मेट्रो स्थानकामध्ये घडली होती. मयत पवन शर्मा यांचा माजी आयएएस अधिकारी संजय प्रताप सिंग आणि त्याचा मुलगा सिद्धार्थ सिंग या दोन आरोपींसोबत राखीव जागेवरून वाद झाला होता. एफआयआर दाखल झाल्यानंतर दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली, असे पोलिसांनी सांगितले.
हा वाद ज्येष्ठ नागरिकांसाठी राखीव असलेल्या जागेवरून सुरू झाला. या वादादरम्यान शर्मा यांना थप्पड मारून नंतर जोरात ढकलण्यात आले, त्यामुळे ते खाली पडले आणि त्यांच्या डोक्याला दुखापत झाली. मेट्रो कर्मचाऱ्यांनी गंभीर जखमी पवन शर्मा यांना रुग्णवाहिकेतून लोकनायक जयप्रकाश रुग्णालयात नेले. तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले, असे दाखल केलेल्या एफआयआरमध्ये म्हटले आहे.
शर्मा यांच्या आई, दुर्गा शर्मा यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून भारतीय न्याय संहितेच्या (बीएनएस) कलम १०५ (सदोष मनुष्यवध) आणि ३(५) (सामूहिक उद्देश) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या सूत्रांनुसार, संजय प्रताप सिंह हे माजी आयएएस अधिकारी असून, त्यांना यापूर्वी केंद्रीय अन्वेषण ब्युरोने (सीबीआय) लाचखोरीच्या प्रकरणात अटक केली होती. त्यांचा मुलगा सर्वोच्च न्यायालयात वकिली करतो. पोलीस या वादाचा आणि शर्मा यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या परिस्थितीचा तपास करत आहेत.

