
प्रदीप पूर्णेकर हत्याकांडप्रकरणी सुभाष शिंदेच्या कोठडीत वाढ; शस्त्रे पुरवल्याचा पोलिसांना संशय…
ठाणे: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे मानपाडा विभागप्रमुख प्रदीप उर्फ बाळू पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी सुभाष शिंदे उर्फ पप्या शिंदे याच्या पोलीस कोठडीत न्यायालयाने आणखी तीन दिवसांची वाढ केली आहे. त्याला १२ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
हत्येसाठी वापरण्यात आलेली दोन पिस्तुले आणि तीन चॉपर कोणी उपलब्ध करून दिले, तसेच फरार आरोपी संतोष कनोजिया उर्फ टल्ली याला दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर मोबाईल आणि सिमकार्ड खरेदी करून कोणी दिले, याचा तपास पोलिसांना करायचा आहे. शस्त्रांची व्यवस्था पप्या शिंदे याने केल्याचा पोलिसांचा संशय आहे. शुक्रवारी कोठडीची मुदत संपल्याने पप्या शिंदे याला न्यायाधीश एस. बी. साबळे यांच्यासमोर हजर करण्यात आले.
दरम्यान, आरोपीच्या वकिलांनी बचाव करताना पुरवणी जबाबात उल्लेख असलेल्या अन्य दोन व्यक्तींच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. तपासातील कथित विसंगतींकडेही त्यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले.
दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर खरेदी केलेला मोबाईल टल्लीला दिल्याचा पोलिसांचा दावा आहे. तसेच हत्येसाठी वापरलेली शस्त्रे कुठून आणली आणि गुन्ह्यानंतर ती कुठे लपवली, याचा तपास अद्याप बाकी आहे. या प्रकरणातील फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस तपास सुरू आहे.

