लोकांवर हल्ला करणाऱ्या वाघिणीला ठार मारा; अमरावतीत वाघिणीच्या हल्ल्यात दोघांच्या मृत्यूनंतर नवनीत राणा यांची मागणी…

अमरावतीः चांदूरबाजार तालुक्यातील सोनोरी येथे २२ वर्षीय तरुणीचा वाघिणीच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यानंतर, आता शिरजगाव कसबा परिसरात एका शेतकऱ्यावर वाघिणीने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. त्यामुळे अवघ्या २४ तासांत वाघिणीच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाल्याने, परिसरात वाघिणीच्या दहशतीने शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

चांदूरबाजार आणि मोर्शी तालुक्यातील विविध भागांमध्ये या वाघिणीचा वावर असल्याचे सांगितले जात आहे. मागील काही दिवसांपासून वाघिणीने अनेक जनावरांची शिकार केल्याची माहितीही समोर आली आहे. त्यामुळे शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. चांदूरबाजार तालुक्यातील सोनोरी येथे रविवारी (ता. ६) उर्मिला बाजीराव इवने (वय २२) या तरुणीवर वाघिणीने हल्ला केला. उर्मिला आपल्या आईसोबत गावाजवळील शेतात शेळ्यांसाठी चारा आणण्यासाठी गेली होती. चारा कापत असताना अचानक वाघीण त्यांच्या दिशेने येताना दिसली.

वाघीण जवळ येत असल्याचे लक्षात येताच उर्मिलाची आई जिवाच्या आकांताने गावाच्या दिशेने पळाली. तरुणीने स्वतःचा बचाव करण्यासाठी झाडावर चढण्याचा प्रयत्न केला. मात्र, वाघिणीने तिच्यावर हल्ला करत तिला झाडावरून खाली खेचले. वाघिणीने तिला सुमारे १५ ते २० फूट झुडपांमध्ये फरफटत नेले. उर्मिलाच्या आईने गावात जाऊन आरडाओरड केल्यानंतर ग्रामस्थ घटनास्थळी धावून आले. ग्रामस्थांचा गोंधळ ऐकून वाघीण तेथून पळून गेली. मात्र, तोपर्यंत उर्मिलाचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच आज शिरजगाव कसबा येथील दामू आवारे यांना वाघिणीने हल्ला करून जिवे मारले. म्हैस डोक जंगलात ही घटना घडली आहे. गेल्या २४ तासांत वाघिणीच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाल्यानंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी मृत उर्मिलाच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी उर्मिलाची आई आणि बहीण यांचे अश्रू अनावर झाले. कुटुंबीयांना पाहून नवनीत राणाही भावूक झाल्या आणि त्यांना अश्रू अनावर झाले. दरम्यान, परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित करत नवनीत राणांनी वाघिणीला पकडण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

या वाघिणीचा शोध घेण्यासाठी वनविभागाकडून ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून शोधमोहीम राबवली जात असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, ड्रोन कॅमेऱ्यात वाघीण दिसत नसल्याने तिचा ठावठिकाणा शोधण्यात अडचणी येत आहेत. दरम्यान, नवनीत राणांनी वाघिणीचा शोध घेण्यासाठी चॉपरचा वापर करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर नवनीत राणा यांनी वनमंत्री आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी मोबाईल कॉन्फरन्सवर चर्चा केल्याची माहिती आहे. ड्रोन कॅमेऱ्यात वाघीण दिसत नाही. त्यामुळे चॉपरने वाघिणीचा शोध घेऊन तिला ठार करावे, अशी मागणी नवनीत राणांनी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!