जखमी गोविंदांच्या उपचारावरून पालघरच्या रुग्णालयात कर्मचाऱ्याला मारहाण; शिवसेना आमदाराच्या मुलासह १७ जणांविरुद्ध गुन्हा…

पालघर: दहीहंडी उत्सवादरम्यान जखमी झालेल्या गोविंदांच्या उपचारावरून पालघरमधील खासगी रुग्णालयात वाद झाल्याची घटना समोर आली आहे. सीटी स्कॅन आणि डिस्चार्जच्या मुद्द्यावरून झालेल्या या वादात रुग्णालयातील कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुख कुंदन संखे, आमदार राजेंद्र गावित यांचा मुलगा रोहित गावित आणि शहरप्रमुख राहुल घरत यांच्यासह १७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहेत.

माध्यमांच्या वृत्तानुसार, शनिवारी (ता. ५) दहीहंडी उत्सवादरम्यान मानवी मनोरा तयार करताना गोविंदा पथकातील पाच जण जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी रिलीफ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यापैकी एका गोविंदाच्या डोक्याला आणि मणक्याला दुखापत झाली होती.

डॉक्टरांनी त्याची प्रकृती तपासण्यासाठी सीटी स्कॅन आणि पुढील उपचारांचा सल्ला दिला. या उपचारासाठी सुमारे २० हजार रुपये खर्च येणार असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले. त्यापैकी १० हजार रुपये आयोजकांनी जमा केले होते.

रुग्णालयाच्या तक्रारीनुसार, गोविंदाला सीटी स्कॅन करण्याची गरज आहे का? असा प्रश्न आयोजकांनी डॉक्टरांना केला. रुग्णाला डिस्चार्ज देण्याची मागणी करण्यात आली. यावरून वाद वाढला आणि त्यानंतर शिवसेनेचे काही पदाधिकारी रुग्णालयात पोचले. रुग्णालय प्रशासनाने केलेल्या आरोपानुसार, या व्यक्तींनी डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली. एका कर्मचाऱ्याच्या कानशिलात मारली, तसेच रुग्णालयाचे नुकसान करण्याची धमकी दिली.

रुग्णालय प्रशासनाने आणखी गंभीर आरोप केले आहेत. काही जणांनी रुग्णालयातील आयसीयूमध्ये प्रवेश करून तेथील रुग्णांना बाहेर जाण्यास सांगितल्याचा दावा करण्यात आला आहे. या घटनेमुळे इतर रुग्णांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्याचे रुग्णालयाने म्हटले आहे.

या प्रकरणी पोलिसांनी १७ आरोपींविरोधात भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. यात दुखापत करणे, अपमान करणे, धमकी देणे, बेकायदेशीर प्रवेश आणि बेकायदेशीर जमाव यांसारख्या आरोपांचा समावेश आहे.

याशिवाय महाराष्ट्र मेडिकेअर सर्व्हिस पर्सन्स अँड मेडिकेअर सर्व्हिस इन्स्टिट्यूशन्स (प्रिव्हेन्शन ऑफ व्हायलन्स अँड डॅमेज ऑर लॉस टू प्रॉपर्टी) ॲक्ट, २०१० अंतर्गतही कारवाई करण्यात आली आहे.

कुंदन संखे यांनी रुग्णालय प्रशासनाचे आरोप फेटाळले आहेत. गोविंदा पथकातील काही जणांना किरकोळ दुखापत झाली होती. मात्र, त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जात नव्हता. त्यामुळे उपचार आणि डिस्चार्जच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी पदाधिकारी रुग्णालयात गेले होते, असे त्यांनी सांगितले. डॉक्टर आणि रुग्णालय कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन केल्याचे आरोप त्यांनी नाकारले आहेत.

दरम्यान, रुग्णालयातील या घटनेमुळे डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. वैद्यकीय कर्मचाऱ्यांवरील हल्ल्यांच्या घटना वाढत असताना रुग्णालयांमधील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी कठोर उपाययोजनांची गरज व्यक्त केली जात आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!