सोन्याच्या तस्करीसाठी वापरला बाळाचा डायपर! केरळच्या करिपुर विमानतळावर तस्करीचा प्रयत्न उघडकीस…

कोझिकोड: केरळमधील करिपुर विमानतळावर सोन्याच्या तस्करीच्या संशयास्पद प्रयत्नात, सोने लपवण्यासाठी आठ महिन्यांच्या बाळाचा वापर करण्यात आल्याचा आरोप आहे. या घटनेत महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) पथकाने, सुमारे १ कोटी रुपयांचे सोने जप्त केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी बुधवारी दिली.

कोझिकोड येथील डीआरआय पथकाने केलेल्या तपासणीदरम्यान, बाळाच्या डायपरमध्ये लपवलेले सुमारे अर्धा किलो सोन्याचे संयुग सापडले, त्याची किंमत सुमारे ५० लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले.

मंगळवारी रात्री आपल्या वडील हे बाळ आणि इतर दोन मुलांसह संयुक्त अरब अमिरातीमधील रास अल खैमाह येथून विमानतळावर आले होते. हे कुटुंब मलप्पुरम जिल्ह्यातील पोन्नानी येथील आहे. सोन्याच्या संभाव्य तस्करीच्या प्रयत्नाबद्दल मिळालेल्या माहितीच्या आधारे डीआरआय पथकाने कारवाई केली आणि तपासणीसाठी त्या कुटुंबाला ताब्यात घेतले.

वडिलांच्या पुढील तपासणीत, त्यांच्या शरीरावर कथितरित्या लपवलेला सोन्याचा आणखी साठा जप्त करण्यात आला. जप्त केलेल्या सोन्याचे एकूण मूल्य अंदाजे १ कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे.

अधिकाऱ्यांनी सांगितले, की हे सोने कुठून आले, यामागे कोण होते आणि यात इतर कोणी सामील होते का, हे शोधण्यासाठी सखोल तपास सुरू आहे. त्या व्यक्तीने यापूर्वीही मुलाचा वापर करून सोने लपवले होते का, याचाही डीआरआय तपास करत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!