
पोलिसानी रचलेल्या ट्रॅपमध्ये पोलिसच अडकले; पीएसआयसह पाच जणांना अटक…
जळगाव : पैसे तिप्पट करून देण्याच्या बहाण्याने एका ग्रामसेवकाला तब्बल १६ लाख रुपयांना फसवल्याची घटना उघडकीस आली आहे. एका पोलिस कर्मचाऱ्यानेच हा कट रचला होता. ग्रामसेवकाला लुटण्यासाठी पोलिसांनीच ट्रॅप रचल्याची बातमी समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पीएसआय प्रकाश मेढे, पोलिस कर्मचारी योगेश शेळके, दिनेश भोई, सचिन धुमाळ आणि निलेश अहिरे अशा पाच संशयित आरोपींना अटक केली आहे.
विकास पाटील असे फसवणूक झालेल्या ग्रामसेवकाचे नाव आहे. त्यांची सचिन धुमाळ नावाच्या व्यक्तीसोबत मैत्री होती. धुमाळ याने ग्रामसेवक विकास पाटील यांना माझ्याकडे काही दिवसात पैसे तिप्पट करून देणारा माणूस असल्याचे सांगितले आणि त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानुसार सोमवारी सायंकाळी सचिन धुमाळ आणि ग्रामसेवक विकास पाटील हे रेल्वे स्थानकावर दाम तिप्पट करून देणाऱ्या व्यक्तीला पैसे देण्यासाठी गेले.
रेल्वे स्थानकावर पैसे घेण्यासाठी निलेश अहिरे आला. त्याला दोघांनी १६ लाख रुपये दिले. त्याचवेळी घटनास्थळी तीन पोलिस कर्मचारी आले, त्यांनी धाड टाकून पैशांच्या बॅगेसह पैसे तिप्पट करून देणाऱ्या निलेश अहिरेला ताब्यात घेतले. त्यावेळी धुमाळ याने ग्रामसेवक विकास पाटील यांना सांगितले की, आता पोलिस पैसे घेऊन गेले आहेत. त्यामुळे आपल्याला काहीच करता येणार नाही, असे सांगितले. तसेच पोलिस आपल्यावरच कारवाई करतील अशी भीती दाखवली.
ग्रामसेवक विकास पाटील हे पोलिस अधीक्षक कार्यालयात आल्यानंतर पोलिस चौकशीत सगळेच समोर आले. पोलिस कर्मचारी योगेश शेळके यानेच हे सगळे षडयंत्र रचले होते. त्याने पीएसआय प्रकाश मेढे आणि दिनेश भोई यांच्यांशी संगनमत करत ग्रामसेवकाचे पैसे लुबाडण्याचा डाव रचल्याचे तपासात उघड झाले. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून पीएसआय प्रकाश मेढे, पोलिस कर्मचारी योगेश शेळके, दिनेश भोई, सचिन धुमाळ आणि निलेश अहिरे या संशयित आरोपीला अटक केली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिस करत आहेत.
हृदयद्रावक! पोलिसकाकाने घेतला जगाचा निरोप…
बदलापूर अत्याचार प्रकरणात कारवाईत दिरंगाई करणाऱ्या पोलिसांना उच्च न्यायालयाचा दणका…
Cyber Crime! पोलिसकाकाच्या खात्यातून 2.3 लाख गायब; कसे गेले पाहा…
लखोबा लोखंडे! दोघींशी लग्न, तिसरीसोबत बोलणी, चौथ्यांदा बोहल्यावर चढणार, तेवढ्यात…
पोलिसाची वर्दी घालून करायचा वसूली; पाहा दिवसाची कमाई…

