
कोरेगाव भीमामध्ये पोलिसांचा असणार तगडा बंदोबस्त…
पुणे (संदीप कद्रे): कोरेगाव भीमा या ठिकाणी दरवर्षी 1 जानेवारी रोजी विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायी येतात, त्याच पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी चोख बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. कोरेगाव भीमा ठिकाणी पोलिसांकडून तगडा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. यासाठी 3200 पोलिस कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत.
पोलिस आयुक्त, पोलिस सहआयुक्त यांच्यासह 11 पोलिस उपायुक्त देखील कोरेगाव भीमा परिसरात बंदोबस्तासाठी तैनात असणार आहेत. यासह 42 सहाय्यक पोलिस आयुक्त, 84 वरिष्ठ पोलिस निरीक्षक देखील या ठिकाणच्या बंदोबस्तासाठी असणार आहेत. त्यांच्या मदतीसाठी 3200 पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह 700 होम गार्डस आणि SRPF च्या 6 तुकड्या असणार आहेत.
दरवर्षी 1 जानेवारी रोजी कोरेगाव भीमा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अनुयायी जमतात. त्यामुळे शुक्रवारपासून या परिसरात कुठलीही राजकीय किंवा धार्मिक सभा घेता येणार नाही. तसेच सोशल मीडियावर देखील पुणे पोलिसांचे लक्ष असणार आहे. १ जानेवारीच्या जय स्तंभ अभिवादन सोहळ्याची सर्व विभागांकडून जोरदार तयारी सुरू असून, या सोहळ्यामध्ये सर्वात महत्त्वाची जबाबदारी पोलिस प्रशासन सांभाळत असते.
कोरेगाव भीमा, वढू बुद्रुक, शिक्रापूर, रांजणगाव येथील परिसरात राज्याचे अतिरिक्त पोलिस महासंचालक संजय सक्सेना यांच्याकडून पाहणी करण्यात आली. यावेळी पुणे जिल्हा ग्रामीण पोलिस अधीक्षक अधीक्षक अंकित गोयल, शिक्रापूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, रांजणगाव पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक महेश ढवान, पोलिस निरीक्षक शिरूर संजय जगताप, वाहतूक पोलिस निरीक्षक जगताप, विशेष शाखेचे पोलिस निरीक्षक प्रवीण मोरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक केशव वाबळे, पोलिस उपनिरीक्षक अविनाश थोरात, पोलिस हवालदार सचिन मोरे, संदीप कारंडे व पोलिस पाटील मालन गव्हाणे उपस्थित होते.
लढाईच्या स्मरणार्थ कोरेगाव भीमा येथे विजय स्तंभ…
कोरेगाव भीमा या ठिकाणी 1 जानेवारी 1818 मध्ये एक ऐतिहासिक लढाई झाली. ही लढाई इंग्रज आणि पेशव्यांमध्ये झाली होती. महार पलटनीच्या जोरावर इंग्रजांनी पेशव्यांच्या विरोधात युद्ध पुकारले होते. हे युद्ध इंग्रजांनी जिंकल्यानंतर त्याच्या स्मरणार्थ कोरेगाव भीमा येथे विजयस्तंभ बांधण्यात आला. 1 जानेवारी 1927 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या विजय स्तंभास भेट देऊन हा इतिहास पुढे आणला. तेव्हापासून या ठिकाणी शौर्य दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली. दरवर्षी कोरेगाव भीमा येथे 1 जानेवारी रोजी विजयस्तंभ शौर्य दिन अनुयायांकडून मोठ्या उत्साहात साजरा होतो. या विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी दरवर्षी 1 जानेवारीला महाराष्ट्रासह देशभरातून आंबेडकर अनुयायी येतात, तसेच इतरही लाखोंच्या संख्येने लोक या ठिकाणी येतात.
कुस्तीने घडविला वर्दीतील डॅशिंग पोलिस अधिकारी
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…
पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

