
कॅनडातील लँगलीमध्ये पेटत्या गाडीत आढळला भारतीय वंशाच्या व्यक्तीचा मृतदेह; ‘टार्गेट किलिंग’चा संशय…
लँगलीः कॅनडातील ब्रिटिश कोलंबियाच्या लँगली परिसरात एका पेटत्या गाडीत तुषार शर्मा (वय २५) याचा मृतदेह सापडला आहे. एका भारतीय वंशाच्या तरुणाच्या संशयास्पद हत्येप्रकरणी लँगली पोलिसांनी तपास करण्यास सुरवात केली आहे. सरे येथील रहिवासी असलेल्या शर्मा यांची ओळख, वाहनात मानवी अवशेष सापडल्यानंतर पोलिसांनी पटवली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, २९ ऑक्टोबर रोजी रात्री सुमारे साडेदहा वाजता लँगलीच्या रॉलिन्सन क्रिसेंट परिसरात एक वाहन जळत असल्याची माहिती मिळाली. लँगली पोलीस अधिकारी आणि अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी पोचले. आग विझवण्याचा प्रयत्न करताना, आपत्कालीन कर्मचाऱ्यांना वाहनाच्या आत मानवी अवशेष आढळले.
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, कॅनडाच्या एकात्मिक हत्या तपास पथकाने तपासाची सूत्रे हाती घेतली आहेत. लँगली आरसीएमपी, न्यायवैद्यक पथके आणि बीसी कोरोनर्स सर्व्हिस देखील तपासात सहकार्य करत आहेत.
शर्मा यांच्या मृत्यूच्या सभोवतालच्या परिस्थितीचा शोध घेण्यासाठी आणि त्यापूर्वीच्या घटनाक्रमाची पुनर्रचना करण्यासाठी तपास अधिकारी काम करत आहेत. तसेच, ते शर्मा कुठे होते आणि मृत्यूपूर्वी त्यांच्या संपर्कात असलेल्या लोकांची ओळख पटवण्याचाही प्रयत्न करत आहेत. पोलिसांच्या मते, शर्माची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नव्हती आणि कॅनडामध्ये त्याचे मित्रमंडळही मोठे नव्हते.
‘आयएचआयटी’च्या सार्जंट फ्रेडा फोंग यांनी सांगितले, की तपास अधिकारी शर्मा यांच्या कुटुंबीयांशी आणि मित्रांशी संपर्क साधण्यात आला असून, चौकशी करण्यात येत आहे. त्यांच्या मृत्यूपूर्वीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल, दैनंदिन दिनचर्या आणि हालचालींबद्दल माहिती गोळा करण्यासाठी ते परदेशात राहणाऱ्या त्यांच्या नातेवाईकांशी आणि ओळखीच्या लोकांशी संपर्क साधण्याचाही प्रयत्न करत आहेत.
हत्येमागील हेतू अद्याप अज्ञात आहे. तथापि, तपास अधिकाऱ्यांना संशय आहे, की शर्मा यांनाच विशेषतः लक्ष्य करण्यात आले होते. त्यांचे कोणाशी वैयक्तिक वैर होते का किंवा हत्येमागे इतर काही कारणे होती का, याचा पोलीस तपास करत आहेत. या गुन्ह्यात किती लोक सामील होते आणि वाहनाला आग का लावण्यात आली, याचाही तपास अधिकारी शोध घेत आहेत.
तपासात मदत करू शकेल अशी कोणतीही माहिती, जसे की सीसीटीव्ही फुटेज किंवा घटनेच्या वेळेच्या आसपास परिसरातील संशयास्पद हालचालींचा तपशील द्यावा, असे आवाहन पोलिसांनी या परिसरातील नागरिकांना केले आहे.

