सामूहिक हत्याकांडाच्या उद्देशाने शिकागोतील हिंदू मंदिरात शिरलेल्या तरुणाची रायफल जॅम; अमेरिकी पोलिसांनी केली अटक…

वॉशिंग्टन: शिकागोमधील इलिनॉय शहरातील अरोरा परिसरात असलेल्या एका हिंदू मंदिरावर हल्ला करून अनेक भाविकांची हत्या करण्याचा कट रचल्याप्रकरणी, एका १९ वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, एका सामूहिक गोळीबाराच्या कटाच्या तपासाअंती पॅलाटाईन येथील आरोपी अलेक्झांड्रोस पापोराकिस याच्या ताब्यातून श्वेतवर्णीय वर्चस्ववादी विचारसरणी व्यक्त करणारा आणि भारतीय वंशाच्या लोकांवरील हिंसेचा उल्लेख असलेला एक जाहीरनामा जप्त करण्यात आला. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली.

नवरात्रीने सुरू होणाऱ्या हिंदू सणांच्या काळात ही अटक झाली आहे आणि ओहायोच्या रिचमंड हाइट्स येथील श्री स्वामीनारायण वटताल धाम हिंदू मंदिराची तोडफोड झाल्याच्या अवघ्या दोन आठवड्यांनंतर ही घटना घडली आहे.

बुधवारी पॅपोराकिसला रोलिंग मीडोज येथील कुक काउंटी थर्ड म्युनिसिपल डिस्ट्रिक्ट कोर्टहाऊसमध्ये हजर करण्यात आले. न्यायाधीशांनी त्याला पोलिसांच्या ताब्यात ठेवण्याचे आदेश दिले. पुढील सुनावणी ३० ऑक्टोबर रोजी होणार आहे.

पॅलाटाईन येथील टॅको बेलमध्ये कॅशियर म्हणून काम करणाऱ्या पापोराकिसविरुद्ध, एका दुसऱ्या व्यक्तीने सामूहिक गोळीबाराचा कट रचल्याची तक्रार केल्यानंतर, पोलिसांनी तपास सुरू केला. तपास अधिकाऱ्यांनी सांगितले, की पापोराकिसने सामूहिक गोळीबार करण्याच्या योजनेची रूपरेषा असलेला एक दस्तऐवज, तसेच रायफल, रायफल मॅगझिन्स, बॉडी आर्मर आणि इतर सामरिक उपकरणे व साहित्य दर्शवणारी छायाचित्रे, तक्रार करणाऱ्या व्यक्तीसोबत शेअर केली होती.

तपासादरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे, गुप्तहेरांना असे वाटते, की पापोराकिस रविवार, ११ ऑक्टोबर रोजी अरोरा परिसरातील एका हिंदू प्रार्थनास्थळाला लक्ष्य करून हल्ला करण्याची योजना आखत होता. त्याचे नेमके नियोजित ठिकाण अद्याप तपासले जात असल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले.

रविवार हा एक खास दिवस ​​असेल, असे आरोपीने त्याच्या टॅको बेलमधील सहकाऱ्यांना सांगितले होते. हा अधिकारी म्हणाला, की पापोराकिसने रविवारी सकाळी त्याच्या एका सहकाऱ्याला फोन करून आपली बंदूक जॅम झाल्यामुळे कोणाच्याही नजरेत न पडता अतिशय वेगाने आपण मंदिरातून निघून गेलो.

प्रार्थनास्थळांचे संरक्षण करणे हे कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेचे प्राधान्य आहे, असे या अधिकाऱ्याने स्पष्ट केले. पॅलाटाईन पोलीस गुप्तहेरांनी इलेक्ट्रॉनिक संवाद आणि पापोराकिस यांच्या नावावर असलेल्या, ‘मी का लढलो: उर्फ: (अरोरा हल्लेखोराचा जाहीरनामा)’ नावाच्या एका दस्तऐवजाची तपासणी केली, त्यात ‘श्वेतवर्णीय वर्चस्ववादी आणि अतिरेकी विचारसरणी व्यक्त करणारी विधाने होती. त्यात दक्षिण आशियाई वंशाच्या, विशेषतः भारतीय वंशाच्या व्यक्तींवरील हिंसेचे संदर्भ समाविष्ट होते.’

पॅलाटाईन आणि माउंट प्रॉस्पेक्ट पोलीस विभागांच्या अधिकाऱ्यांनी समन्वय साधून तत्काळ कारवाई केली आणि त्यांच्या संयुक्त प्रयत्नांतून, ११ ऑक्टोबरच्या संध्याकाळी पापोराकिस त्याच्या निवासस्थानातून बाहेर पडत असताना त्याला शोधून ताब्यात घेण्यात आले.

त्यानंतरच्या तपासाचा भाग म्हणून, पॅलाटाईन पोलीस गुप्तहेरांनी पापोराकिसच्या निवासस्थानाची झडती घेतली आणि एक रायफल, अनेक भरलेली रायफल मॅगझिन्स, शेकडो अतिरिक्त रायफल दारुगोळा, सामरिक उपकरणे आणि तपासासाठी संबंधित असल्याचे मानले जाणारे इतर साहित्य जप्त केले. त्यांना बॉडी आर्मर असलेले एक सामरिक वेस्ट आणि श्वेतवर्णीय वर्चस्ववादी अतिरेकी विचारांशी संबंधित प्रतिमा असलेले एक पॅच देखील सापडले.

पॅलाटाईन आणि माउंट प्रॉस्पेक्ट पोलीस विभागांनी अरोरा पोलीस विभागालाही संभाव्य धोक्याबद्दल सूचित केले होते, त्यांनी त्यांच्या अधिकारक्षेत्रातील हिंदू प्रार्थनास्थळांपर्यंत पोचण्यासाठी समन्वय साधला आणि त्यांना हल्ल्याच्या कटाबद्दल माहिती दिली. पापोराकिसवर दहशतवादी धमकी देणे आणि बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगणे या प्रत्येक गुन्ह्यासाठी एक-एक आरोप ठेवण्यात आला आहे, ज्यामध्ये १६ इंचांपेक्षा कमी लांबीची नळी असलेल्या रायफलचा समावेश आहे.

पॅलाटाईन पोलीस विभागाने सांगितले की, तपास सुरू असून संभाव्य अतिरिक्त आरोपांच्या पुनरावलोकनासह, ते एफबीआयसोबत जवळून काम करत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!