
गंगा नदीत बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत वैशालीमध्ये १३ मुलांचा बुडून मृत्यू; बेपत्ता लोकांचा शोध चालू…
वैशाली: बिहारमधील वैशाली येथे गंगा नदीत बोट उलटून झालेल्या दुर्दैवी अपघातात, १३ मुलांचा मृत्यू झाला असून, बेपत्ता झालेल्यांचा प्रवाशांचा शोध चालू आहे. आणखी मृतदेह न सापडल्याने मृतांचा आकडा १३ वरच कायम आहे. सर्व मृत व्यक्ती १५ वर्षांखालील मुले होती, असे वैशालीच्या जिल्हाधिकारी वर्षा सिंह यांनी सांगितले.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, ही घटना मंगळवारी रात्री सुमारे साडेआठ वाजता घडली. रामपूर श्यामचंद गावातील लोक नदीपलीकडील एका गावात मेजवानीसाठी जात होते. जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, एकूण सहा जणांना वाचवण्यात आले आहे. बचाव आणि मदतकार्य चालू आहे.
एसडीआरएफचे उपनिरीक्षक जयदीप नारायण सिंह यांनी पत्रकारांना सांगितले की, २० हून अधिक प्रवासी असलेली ही बोट पाण्यातून बाहेर काढण्यात आली आहे.
मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येक मुलाच्या कुटुंबीयांना ४ लाख रुपयांची सानुग्रह मदत जाहीर केली. भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार सतीश कुमार यादव आणि एलजेपीचे विधान परिषद सदस्य अश्रफ अन्सारी यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनी घटनास्थळी भेट देऊन, पीडितांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
राघोपूर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी सांगितले की, आपण जिल्हा प्रशासनाशी चर्चा केली असून, आपल्याला परिस्थितीची माहिती देण्यात आली आहे. नवी दिल्लीहून परतल्यानंतर ते घटनास्थळाला भेट देणार आहेत.
दरम्यान, प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा आरोप करत स्थानिकांनी गावात आंदोलन केले आणि संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध एफआयआर नोंदवण्याची मागणी केली.

