इन्स्टाग्रामवर रील टाकून ५ रुपयांत ५१ लाख रुपयांचे अमिष; मुंबईत ३ लाखांची फसवणूक…

मुंबईः वरळी परिसरात ५ रुपयांच्या जुन्या नोटांच्या बदल्यात तब्बल ५१ लाख रुपये मिळवून देण्याचे अमिष दाखवत, एका व्यक्तीची ३ लाख ३ हजार २३१ रुपयांची सायबर फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरोपींनी इन्स्टाग्रामवरील रीलच्या माध्यमातून मोठ्या नफ्याचे आमिष दाखवत ही फसवणूक केल्याची माहिती आहे.

तक्रारदाराने इन्स्टाग्रामवर एक रील पाहिली होती. त्यात ५ रुपयांच्या जुन्या नोटांच्या बदल्यात मोठी रक्कम मिळेल, असा दावा करण्यात आला होता. रील पाहिल्यानंतर तक्रारदाराने त्यामध्ये दिलेल्या व्हॉट्सअॅप क्रमांकावर आरोपींशी संपर्क साधला. आरोपींच्या सांगण्यावरून तक्रारदाराने ५ रुपयांच्या पाच जुन्या नोटांचे फोटो व्हॉट्सअॅपद्वारे त्यांना पाठवले. त्यानंतर आरोपींनी या नोटांच्या बदल्यात ५१ लाख रुपये मिळू शकतात, असा दावा केला.

आरोपींनी विविध शुल्क आणि प्रक्रियेच्या नावाखाली क्यूआर कोडद्वारे ११ हजार रुपये जमा करण्यास सांगितले. त्यानंतर अधिक नफ्याचे आमिष दाखवत तक्रारदाराकडून वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये सातत्याने पैसे ट्रान्सफर करून घेण्यात आले. ४ जून ते १२ जून २०२६ या कालावधीत तक्रारदाराकडून एकूण ३ लाख ३ हजार २३१ रुपये जमा करून घेण्यात आले. मात्र, ५१ लाख रुपये न मिळाल्याने आणि आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने वरळी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.

वरळी पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. आरोपींविरोधात आयटी कायद्याच्या कलम ६६ (सी), ६६ (डी) तसेच बीएनएसच्या कलम ३१८ (४) आणि ३१९ (२) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस आता आरोपींनी वापरलेले व्हॉट्सअॅप क्रमांक, क्यूआर कोड तसेच ज्या बँक खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर करण्यात आले, त्या माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!